, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कोयत्याचे माहेरघर! पुण्याची नवी ओळख?

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात कोयता गँगची दहशत वाढली आहे. किरकोळ कारणांवरून कोयते काढले जात असून, पुस्तकाऐवजी कोयता हेच ओळखीचे चिन्ह बनले.

कोयत्याचे माहेरघर! पुण्याची नवी ओळख?

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमच्या प्रिय शहराला आजकाल एक नवी ओळख मिळाली आहे. शहराची ओळख पार बदलून गेली आहे. आता या शहराला विद्येचे माहेरघर कसे म्हणावे? त्याची ओळख तर ‘कोयत्याचे माहेरघर’ अशी झाली आहे.

इतके कोयते आले तरी कुठून, हेच कळत नाही. बहुतेक ही मंडळी दक्षिणेकडील चित्रपट पाहत असावीत. जरा काही झाले की, पटकन कोयते काढतात. अगदी न्यायालयाच्या आवारातसुद्धा कोयते काढतात आणि समोरच्याला अर्धमेला करून टाकतात. त्यांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही; कोयत्याच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे. झटकन कोयता काढतात आणि पटकन न्याय देऊन मोकळे होतात.

कोयता गँगची कार्यपद्धती

जीवावर उदार होऊन ही कोयतेमंडळी आपले काम करत असतात. त्यांना कोयते गँग असे संबोधले जाते. त्यांच्याकडे मोटारसायकली असतात. एखाद्याचा हात-पाय तोडून मोटारसायकलीवरून फरार होतात. आणि कारणे तरी काय साधी असतात — एखाद्याने आमच्या जागेत पार्किंग केले किंवा आमच्याकडे रागाने बघतो, म्हटल्यावर काढ कोयता, कर कलम… असा त्यांचा न्याय असतो. पोलिस तरी काय करतील बिचारे! कोयते गँगला घाबरून तेच आपल्या जीवाला जपत नसतील कशावरून?

पुस्तकाऐवजी कोयता

परवा भाचा बसस्थानकावर आला होता. पोलिसांनी त्याला पकडले होते. त्याच्या पिशवीत कोयता सापडला होता. नारळ फोडण्यासाठी त्याने गावाहून तो आणला होता. एकंदरीत कोयत्यामुळे वाईट अवस्था झाली आहे. आता पुण्यात माणसाची ओळख त्याच्या शिक्षणावरून नाही, तर त्याच्या हातात कोयता आहे की नाही, यावरून तर ठरणार नाही ना? विद्येच्या माहेरघरात पुस्तक घेऊन फिरणारा संशयित आणि कोयता घेऊन फिरणारा भाई झाला आहे. आता बहुतेक पुण्याची नवी पदवीच द्यावी लागेल — बी.ए. नव्हे, तर बी.के. म्हणजे बॅचलर ऑफ कोयता!

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance