दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील एका नोकरदाराला मोबाईलवर आलेला एक संदेश महागात पडला. सॉफ्टवेअर अपडेट करण्याच्या संदेशावर क्लिक करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि अज्ञात चोरट्याने त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ३४ हजार १ रुपये परस्पर काढून घेतले. या प्रकरणी दापोली पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले?
गिम्हवणे तेलीवाडी येथे राहणारे नीलेश सूर्यकांत झगडे (वय ४२) हे नोकरदार आहेत. ९ जुलै २०२६ रोजी त्यांच्या मोबाईलवर सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा संदेश आला. मोबाईल अद्ययावत करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या संदेशावर क्लिक केले. त्यानंतर मोबाईल हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर मोबाईल गरम होऊ लागला, बॅटरी वेगाने संपायला लागली आणि गुगल पे अॅप बंद पडू लागले. १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोबाईलमधील गुगल पे अॅप आपोआप सुरू झाले. त्यावेळी झगडे यांनी बँक खात्यातील शिल्लक तपासली असता खात्यात केवळ ९०६ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले.
बँक विवरणातून फसवणूक उघड
खात्यातून पैसे काढल्याचा संशय आल्याने त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियाकडून खात्याचे विवरणपत्र घेतले. त्यातून १० ते १२ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या व्यवहार क्रमांकांद्वारे त्यांच्या खात्यातून एकूण २ लाख ३४ हजार १ रुपये परस्पर हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट झाले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर झगडे यांनी २७ नोव्हेंबर रोजी दापोली पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा