महागाईमुळे सर्वसामान्यांचे घरखर्चाचे गणित आधीच बिघडले असताना आता आजारपणही महाग झाले आहे. महाराष्ट्रात आजारी व्यक्तीला उपचारांसाठी वर्षभरात सरासरी ३,५२२ रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागत आहेत. देशभरात हाच खर्च सरासरी २,९०१ रुपये आहे. म्हणजेच देशाच्या सरासरीच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांना ६२१ रुपये अधिक मोजावे लागतात.
रुग्णांच्या उपचारावरील खर्चाच्या बाबतीत महाराष्ट्र केरळ आणि हिमाचल प्रदेशानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रीय आरोग्य लेखा अहवालातील ताज्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या तुलनेतही महाराष्ट्रातील रुग्णांना उपचारांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
सरकारी योजनांचा लाभ असूनही खिसा रिकामा का?
सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळत असला, तरी डॉक्टरांची फी, तपासण्या आणि औषधांचा खर्च अनेकदा रुग्णांनाच करावा लागतो. त्यामुळे सरकारी योजना असूनही आजारपणाचा खर्च कमी होत नाही. सरकारी आरोग्य योजनांचा लाभ प्रामुख्याने रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या उपचारांसाठी मिळतो. मात्र आजाराची प्राथमिक तपासणी, डॉक्टरांची फी, रक्ताच्या चाचण्या, क्ष-किरण तपासणी आणि औषधांचा खर्च रुग्णांनाच करावा लागतो.
नियमित तपासण्या आणि औषधांसाठी सरकारी योजनांचे संरक्षण मर्यादित असल्याने रुग्णांचा खिसा रिकामा होतो. त्यात खासगी रुग्णालये आणि औषधांवरील खर्चाची भर पडते. त्यामुळे आरोग्य विमा किंवा सरकारी योजनेचा लाभ असूनही सामान्य नागरिकांना उपचारांसाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागत आहेत.
सरकारी खर्च कमी, नागरिकांवर भार अधिक
महाराष्ट्रात आरोग्यावर वर्षाला केवळ २९.३ टक्के खर्च सरकार करते. देशात हे प्रमाण ४३.५ टक्के आहे. सरकारचा वाटा देशाच्या तुलनेत कमी असल्याने उपचारांचा भार नागरिकांच्या खिशावर पडतो, हे अहवालातील आकडेवारीवरून दिसून येते. आजारपणाचा वाढता खर्च आणि सरकारी योजनांच्या मर्यादा यामुळे सामान्य कुटुंबांच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा