राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला जोरदार टक्कर दिली आहे. पंचायत समिती उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. राज्यातील ४१९ पंचायत समित्यांपैकी ४१८ ठिकाणांचे निकाल समोर आले असून, काँग्रेसने २५७ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे भाजपला ९१ जागांवरच यश मिळाले.
इतर पक्षांची कामगिरी
उपसभापती निवडणुकीत राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने ३४ जागा मिळवल्या. भारत आदिवासी पक्षाने १० आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीन जागांवर यश मिळवले. याशिवाय २३ पंचायत समित्यांमध्ये अपक्ष उमेदवार उपसभापती म्हणून निवडून आले आहेत. याआधी झालेल्या पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली होती. राज्यातील ३७ जिल्हा परिषदांपैकी २४ जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसने विजय मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. भाजपला पाच जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाले.
जिल्हानिहाय चित्र
उदयपूर जिल्ह्यातील १९ पंचायत समित्यांपैकी भाजपने १३ ठिकाणी उपसभापती पद मिळवले. त्यातील दोन ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले. काँग्रेसला पाच पंचायत समित्यांमध्ये विजय मिळाला, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. टोंक जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला. जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी सात ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उपसभापती म्हणून निवडून आले. भाजपला टोडारायसिंग पंचायत समितीत एका जागेवर विजय मिळवता आला. जैसलमेर, राजसमंद आणि सवाई माधोपूर जिल्ह्यांमध्येही काँग्रेसने चांगली कामगिरी केली. दुसरीकडे पाली आणि डीग जिल्ह्यांमध्ये भाजपने उपसभापती पदावर यश मिळवले. राजस्थानमध्ये २०२८ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकाल राज्यातील राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा