निपाणीजवळील कोडणी गावात एका होतकरू विद्यार्थ्याचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण गाव शोकात बुडाले आहे. कुणाल विश्वास भिसे (वय १६) हा नववीत शिकणारा विद्यार्थी शनिवारी (दि. २८) अचानक गेला. अवघ्या सोळाव्या वर्षी काळाने घाला घातल्याने गावावर शोककळा पसरली असून, त्याच्या जाण्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शांत आणि अभ्यासू विद्यार्थी
कुणाल अर्जुननगर येथील मोहनलाल दोशी विद्यालयात शिक्षण घेत होता. तो अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि अभ्यासात हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होता. शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये त्याने आपल्या स्वभावामुळे आपुलकीचे स्थान निर्माण केले होते. त्याच्या निरागस स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका होता.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कुणालच्या निधनाची वार्ता गावात समजताच ग्रामस्थांनी त्याच्या निवासस्थानी धाव घेतली. घरातील कुटुंबीयांचा आक्रोश आणि अश्रूंनी उपस्थितांचेही काळीज हेलावून गेले. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी आणि आजोबा असा परिवार आहे. एका होतकरू विद्यार्थ्याच्या अकाली जाण्याने कोडणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा