मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना पक्षातील नेत्यांकडून वेगवेगळी विधाने समोर येत आहेत. त्यामुळे पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना पक्ष डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या विधानानंतर पक्षात खळबळ उडाली.
रोहित पवारांचा सूचक टोला
आव्हाड यांच्या पाठिंब्याच्या घोषणेनंतर आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर दोन पोस्ट करत पक्षांतर्गत घडामोडींवर भाष्य केले. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी रामायणाचा संदर्भ देत, त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाच्या पायावर उभे असलेले महाभारत सध्या घडताना दिसत असल्याचे म्हटले. या पोस्टमुळे त्यांनी आपल्याच पक्षाला टोला लगावल्याची चर्चा रंगली.
दुसऱ्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. अजित पवार ज्यावेळी सत्तेत सहभागी झाले, त्यावेळीही आपण सत्तेसोबत गेलो नव्हतो. तेव्हा नाते बाजूला ठेवून विचाराच्या बाजूने लढलो आणि आजही तसेच उद्याही तीच भूमिका कायम राहील, असे त्यांनी नमूद केले.
सोमवारी खासदारांची बैठक, मग भूमिका स्पष्ट
दरम्यान, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. डिलिमिटेशन बिलाचा निर्णय संसदेमध्ये बिल वाचल्यानंतरच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर भाष्य करताना सांगितले की, जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे आमदार आहेत, ते खासदार नाहीत. सर्व खासदार एकत्रित येऊन सोमवारी आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने केलेल्या पोस्टवर आणि विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या भूमिकेवरही अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतला आहे. डिलिमिटेशन बिलाबाबतची भूमिका अद्याप जाहीर केलेली नसल्याने काँग्रेसची भूमिका चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणे म्हणजे भाजपसोबत जाणे असे नाही, हे सातत्याने अधोरेखित केले जात आहे. त्यामुळे पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, हे सोमवारी सर्व खासदारांच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा