राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राजीनामा सत्र सुरूच आहे. पक्षाचे युवकचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला. डिलिमिटेशन बिलाला पक्ष पाठिंबा देत असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
जगताप यांनी आपल्या पत्रात पक्ष नेतृत्वाला थेट सवाल केला आहे. आपला पक्ष भाजपशी हातमिळवणी करणार असेल, तर कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मागे न पळता थेट भाजपमध्येच जाणे योग्य नाही का, असे त्यांनी विचारले आहे. जर विरोधच करायचा असेल, तर भाजपचा ठामपणे विरोध करणाऱ्या पक्षाला पाठिंबा का देऊ नये, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
मतदारसंघात संघर्ष, तरी विचारांशी तडजोड नाही
मतदारसंघात बलाढ्य विरोधकांशी लढलो, त्रास सहन केला आणि आर्थिक नुकसान सोसले, तरी विचारांशी तडजोड कधीच केली नाही, असे जगताप यांनी पत्रात म्हटले आहे. मात्र आपलेच नेते सत्ताधारी नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसणार असतील, तर कार्यकर्त्यांनी संघर्ष का करावा, असा सवाल त्यांनी पक्ष नेतृत्वाला केला आहे.
ज्या पक्षाशी इतकी वर्षे प्रामाणिक राहिलो, त्या पक्षाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची किंमत नाही असे वाटायला लागले असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
डिलिमिटेशनवर आक्षेप
डिलिमिटेशन विधेयक हे फक्त खासदारांची संख्या वाढवणे आणि महिलांना ३३ टक्के आरक्षण देणे एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यातून मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित केल्या जाणार आहेत, असे जगताप यांनी नमूद केले आहे. ग्रामपंचायतीची वॉर्ड रचना करताना भाजपचे नेते आपली ग्रामपंचायत कशी येईल अशा पद्धतीने सूचना देतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
लोकसभा मतदारसंघाच्या सीमा अशा पद्धतीने ठरवल्या जातील की त्याचा थेट फायदा भाजपला होईल, असा आक्षेप त्यांनी नोंदवला आहे. विरोधकांना देशातून पूर्णपणे हद्दपार करण्याचा सत्ताधाऱ्यांचा विचार असताना आपला पक्ष त्यास पाठिंबा देतो, हे पाहून मनाला वेदना होतात, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवारांवरील प्रेम कायम राहील, मात्र पक्षाच्या निर्णयाशी सहमत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जगताप यांनी प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तसेच अध्यक्ष, माण-खटाव विधानसभा या पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी सातारा-सांगली विधान परिषदेची निवडणूक लढवली होती.
प्रतिक्रिया व्यक्त करा