हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आपल्या सुरेल आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गायक म्हणजे मोहम्मद रफी. रोमँटिक गाणी असोत, विरहगीतं असोत किंवा भक्तिगीतं, प्रत्येक गाण्यात ते अक्षरशः प्राण ओतायचे. त्यांच्या अशाच एका गाण्याचा किस्सा आजही संगीतप्रेमींमध्ये चर्चिला जातो. ते गाणं म्हणजे ‘ओ दुनिया के रखवाले’.
१५ दिवसांचा रियाज
हे गाणं १९५२ मध्ये प्रदर्शित झालेल्या बैजू बावरा या चित्रपटातील आहे. या गाण्याचे संगीत नौशाद यांनी दिले होते, तर गीत शकील बदायुनी यांनी लिहिले होते. चित्रपटात भारत भूषण यांनी साकारलेल्या बैजूच्या मनातील वेदना आणि अस्वस्थता या गाण्यातून व्यक्त होते. त्यामुळे केवळ सूर अचूक लावणं पुरेसं नव्हतं, तर त्या स्वरांमधून पात्राच्या मनातील दुःखही व्यक्त करणं आवश्यक होतं.
या गाण्यात अनेक ठिकाणी अत्यंत उंच पट्टीतील स्वर आहेत. विशेषतः गाण्याच्या शेवटाकडे जाताना रफी यांचा आवाज ज्या उंचीवर पोहोचतो, ते ऐकणाऱ्यांना आजही थक्क करतं. या कठीण स्वरांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी रफी यांनी जवळपास १५ दिवस रियाज केला होता.
रेकॉर्डिंगदरम्यान घशातून रक्त
या गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान रफी यांनी अत्यंत उंच स्वर लावले. त्यानंतर त्यांच्या आवाजावर मोठा ताण आला आणि काही काळ त्यांना गाण्यापासून विश्रांती घ्यावी लागली. इतकंच नव्हे, तर हे गाणं गाताना त्यांच्या घशातून रक्तही आलेलं.
या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी वापरलेला राग. संगीतकार नौशाद यांनी बैजूच्या दुःखद मनःस्थितीला साजेसा दरबारी राग निवडला होता. या रागातील गंभीर आणि भावपूर्ण स्वरांमुळे गाण्यातील वेदना अधिक प्रभावीपणे व्यक्त झाली. नौशाद यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, बैजूच्या मनातील तुटलेपण व्यक्त करण्यासाठी त्यांनी हा राग निवडला होता. त्यामुळे ‘ओ दुनिया के रखवाले’ हे केवळ उंच पट्टीतील गाणं न राहता एका दुःखी मनाचा आर्त स्वर बनलं. बैजू बावरा चित्रपटातील ‘मन तडपत हरि दर्शन को आज’, ‘तू गंगा की मौज’ आणि ‘ओ दुनिया के रखवाले’ ही गाणी प्रचंड गाजली. या गाण्यांमुळे रफी आणि नौशाद यांची जोडी अधिक लोकप्रिय झाली.
प्रतिक्रिया व्यक्त करा