एकेकाळी मराठी मालिका विश्व गाजवणारी अभिनेत्री नेहा गद्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनयातून ब्रेक घेऊन ती परदेशात स्थायिक झाली होती. आता ती मायदेशी परतली असून पुन्हा कामाला सुरुवात करण्यास सज्ज झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील एक जुना किस्सा सांगितला, ज्यात एका प्रोजेक्टसाठी बिकीनी घालण्यास नकार दिल्यावर तिचे बाबा तिच्यावर ओरडले होते.
बिकीनी नाकारल्यावर बाबांची प्रतिक्रिया
मुलाखतीत नेहाने सांगितले की, तिच्याकडे एक प्रोजेक्ट आला होता, ज्यात तिला बिकीनी घालायची होती. मात्र, ती त्यात आरामदायी नसल्याने तिने त्या प्रोजेक्टला नकार दिला. ही गोष्ट तिने बाबांना सांगितल्यावर बाबा तिच्यावर ओरडले. नेहा म्हणाली की, तिच्यासाठी हे खूप धक्कादायक होते. तिचे आई-बाबा मोकळ्या विचारांचे आहेत, हे तिला माहीत होते. मात्र, ते इतके मोकळे असतील, असे तिला वाटले नव्हते.
बाबांनी तिला सांगितले की, हे तिचे काम आहे आणि तिचे क्षेत्र आहे. काय करायचे आणि काय नाही, हे तिला माहीत आहे. त्यामुळे व्यावसायिकतेत अशा गोष्टी आणू नयेत, असे त्यांचे म्हणणे होते. तिने त्या कारणामुळे प्रोजेक्ट नाकारल्याने बाबा खूप नाराज झाले होते. मात्र, आई-बाबांकडून तिला नेहमीच प्रचंड साथ मिळाली आहे. त्यामुळेच ती या क्षेत्रात इतकी वर्षे टिकून राहिली, असे नेहा म्हणाली.
लग्नानंतर ऑस्ट्रेलियात, आता पुन्हा भारतात
नेहा गद्रेने २ मार्च २०१९ रोजी ईशान बापट याच्याशी लग्न केले. लग्नानंतर ती पतीसह ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आणि तिने अभिनयातून ब्रेक घेतला. जवळपास सात वर्षे ती ऑस्ट्रेलियात राहत होती. दरम्यान, १० फेब्रुवारी २०२५ रोजी नेहा आणि ईशान यांच्या आयुष्यात एका मुलाचे आगमन झाले. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या आयुष्यात नवा आनंद आला. मात्र, कुटुंबापासून दूर राहण्याची खंतही तिला जाणवत होती. म्हणूनच तिने पुन्हा भारतात यायचा निर्णय घेतला. आता ऑस्ट्रेलियातून परतल्यावर तिने कामाला सुरुवात करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे तिला पुन्हा सिनेमा किंवा मालिकेत पाहता येणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा