आज मोठ्या बजेटचे चित्रपट तयार करण्यासाठी निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊस कोट्यवधी रुपये खर्च करतात. मात्र, बॉलिवूडमध्ये जवळपास ५० वर्षांपूर्वी एक असा चित्रपट तयार झाला होता, ज्यासाठी देशातील ५ लाख शेतकऱ्यांनी आर्थिक मदत केली होती. विशेष म्हणजे, प्रत्येक शेतकऱ्याने केवळ २ रुपये दिले होते. तो चित्रपट म्हणजे १९७६ मध्ये प्रदर्शित झालेला श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’. हा चित्रपट भारतातील पहिला क्राउडफंडेड चित्रपट मानला जातो.
शेतकऱ्यांच्या पैशातून उभा राहिला चित्रपट
गुजरातमधील ५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या चित्रपटासाठी निधी उभारला होता. त्यांच्या प्रत्येकी २ रुपयांच्या योगदानातून चित्रपट निर्मितीचा खर्च उभा राहिला. श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीज कुरियन यांच्याकडे चित्रपट निर्मितीसाठी पुरेसा निधी नव्हता. त्यावेळी शेतकऱ्यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली. या चित्रपटाची कथा डॉ. कुरियन आणि विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती.
‘मंथन’ चित्रपटाची कथा दुग्ध सहकारी चळवळीपासून प्रेरित होती. कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कामकाजाचा प्रभाव या चित्रपटावर दिसून येतो. ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची ताकद यातून मांडण्यात आली.
चित्रपटाचे चित्रीकरण आणि पुरस्कार
चित्रपटाचे चित्रीकरण ज्या ठिकाणी सुरू होते, तिथे पाण्याची मोठी कमतरता होती. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन श्याम बेनेगल यांनी मुख्य कलाकारांना ४५ दिवस एकाच प्रकारचे कपडे वापरण्यास सांगितले. त्यामुळे चित्रपटातील ग्रामीण वातावरण अधिक वास्तववादी वाटले.
या चित्रपटात गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह आणि अमरीश पुरी यांनी भूमिका साकारल्या होत्या. १९७७ मध्ये ‘मंथन’ला सर्वोत्कृष्ट हिंदी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर विजय तेंडुलकर यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रतिक्रिया व्यक्त करा