प्रसाद खांडेकर हे नाव घेतलं की डोळ्यांसमोर येते ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधली त्याची खळखळून हसवणारी पात्रं. विनोदी अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन अशा तिन्ही आघाड्यांवर त्यानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण आज यशाच्या शिखरावर असलेला हा कलाकार मुळात क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न पाहत होता. लहानपणीच मुंबईच्या अंडर-१४ संघात त्याची निवड झाली होती. मात्र दहावीच्या परीक्षेनंतर झालेल्या एका मोठ्या अपघातानं त्याचं क्रिकेटचं स्वप्न अपूर्ण राहिलं आणि त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळालं.
दहावीनंतरचा अपघात आणि उपचारांचा काळ
एका मुलाखतीत प्रसादनं या कठीण काळाबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, तो मुळात क्रिकेटपटूच होता आणि मुंबईकडून अंडर-१४साठी त्याची निवड झाली होती. दहावीनंतर त्याचा मोठा अपघात झाला आणि त्यानंतर सगळं थांबलं. जवळपास तीन महिने केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अपघातामुळे त्याला खेळापासून दूर व्हावं लागलं. पण या धक्क्यानं तो खचला नाही. आयुष्यात आलेल्या या अनपेक्षित वळणानंतर त्यानं अभिनयाचं नवं क्षेत्र निवडलं.
नाटक पाहून अभिनयाची आवड निर्माण झाली
प्रसादचे वडील नाटकाचे मोठे चाहते होते. ते अनेकदा त्याला सोबत घेऊन नाटक पाहायला जायचे. त्यामुळे लहानपणापासूनच त्याला नाटकांची आणि अभिनयाची गोडी लागली होती. अपघातानंतर त्यानं वडिलांसोबत भरत जाधव यांचं ‘श्रीमंत दामोदर पंत’ हे नाटक पाहिलं. हे नाटक पाहिल्यानंतर त्याला अभिनय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यावेळी त्याला असं वाटलं की, अभिनय हा क्रिकेटसारखाच आहे. इथेही केलेल्या कामाची समोरासमोर पोचपावती मिळते. प्रेक्षकांची दाद आणि टाळ्यांचा आवाज यामुळे त्याला अभिनयाकडे वळायचं होतं.
कांदिवलीतील ठाकूर महाविद्यालयात शिकत असताना प्रसादनं स्वतः पुढाकार घेतला. तिथे मराठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती आणि एकांकिका किंवा मराठी नाटकांसाठी फारसं व्यासपीठ नव्हतं. त्यामुळे त्यानं दहा ते पंधरा मुलांना एकत्र आणलं आणि ‘मराठी कलामंच’ नावाचा ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून तो एकांकिका करू लागला. इथूनच त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. पुढे ‘आम्ही पाचपुते’ हे त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक ठरलं.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे प्रसादच्या कारकिर्दीला मोठं वळण मिळालं. या कार्यक्रमातील त्याच्या विविध विनोदी भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नम्रता संभेरावसोबतची त्याची जोडी विशेष लोकप्रिय झाली. अभिनयासोबतच त्यानं लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केलं. ‘कुर्रर्रर्र’ या विनोदी नाटकातूनही त्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या त्याचं ‘थेट तुमच्या घरातून’ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा