मॉस्को येथे आयोजित एका कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेदरम्यान केरळचा १७ वर्षीय राऊल जॉन अजू आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात रंजक चर्चा झाली. एआय मुलांच्या आवडीनिवडीनुसार शिक्षणाला आकार देऊ शकते, असा युक्तिवाद अजू याने मांडला, तर एआयवरील अतिअवलंबित्वाबाबत पुतिन यांनी चिंता व्यक्त केली.
भारताचा ‘एआय कीड’ म्हणून ओळखला जाणारा १७ वर्षीय उद्योजक राऊल जॉन अजू याने मॉस्कोमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेत रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. संवादादरम्यान अजूने सांगितले की एआयच्या मदतीने शिक्षण मुलांच्या आवडी आणि शिकण्याच्या पद्धतीनुसार तयार करता येऊ शकते.
खेळातून शिकण्याचा अनुभव
गणिताचे उदाहरण देत अजू म्हणाला की कल्पना करा, माझ्यासारखा एक मुलगा आहे, ज्याला गणित आवडते. जर मी चित्रे, व्हिडीओ आणि अगदी खेळांच्या माध्यमातून गणित शिकू शकलो तर काय होईल? तो म्हणाला की त्याने एआयदेखील खेळांच्या माध्यमातूनच शिकले आहे.
अजूने सांगितले की गणिताच्या परीक्षेच्या एक दिवस आधी त्याच्या वडिलांनी त्याला खेळ खेळताना पाहून प्रश्न विचारला होता. वडील म्हणाले की तू खेळ कसा काय खेळतो आहेस, उद्या तुझी परीक्षा आहे. त्यावर अजू म्हणाला की मी अभ्यासच करत आहे. या अनुभवावरून त्याला जाणवले की शिकणे मजेदार आणि मुलाच्या स्वतःच्या गरजेनुसारही असू शकते.
सारांश असा की मी मजेदार पद्धतीने शिकू शकत होतो, माझ्या पद्धतीने आणि माझ्या सोयीनुसार शिकू शकत होतो, असे अजू म्हणाला. मात्र ४० मुलांच्या वर्गात एक शिक्षक प्रत्येक मुलाच्या अभ्यासाला त्याच्यानुसार कसा सामावून घेऊ शकेल, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. एआयमुळे प्रत्येक मुलाला त्याच्या गतीने आणि आवडीनुसार शिकता येईल, असा त्याचा विश्वास आहे.
पुतिन यांची चिंता
दुसरीकडे पुतिन यांनी एआयवर अतिअवलंबित्व वाढल्यास त्याचे काय परिणाम होतील, याबाबत चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञानाचा वापर शिकण्यासाठी व्हावा, पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते, अशी त्यांची भूमिका असल्याचे या चर्चेतून समोर आले.
एका १७ वर्षीय तरुण उद्योजकाने थेट राष्ट्राध्यक्षांशी एआय आणि शिक्षणाच्या भविष्यावर चर्चा केल्याने या संवादाची जगभरात चर्चा होत आहे. शिक्षणात तंत्रज्ञानाची भूमिका काय असावी, या विषयावर या चर्चेने नव्याने विचारमंथन सुरू केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा