केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली आहे. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, रिजिजू यांनी या विशेष अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे, हे स्पष्ट केलेले नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र्यांच्या माहितीनुसार, लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरला होणार आहे. हे विशेष अधिवेशन ३ डिसेंबरला संपण्याची शक्यता आहे.
एप्रिलमध्ये विधेयक का रखडले?
महिला आरक्षण कायदा आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित १३१ वी घटनादुरुस्ती करण्यासाठीचे विधेयक १७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. महिलांना संसदेत ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकांवर मतदान झाले, तेव्हा २९८ खासदारांनी या विधेयकांच्या बाजूने, तर २३० खासदारांनी विरोधात मतदान केले. ११ खासदार अनुपस्थित होते. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत किमान दोन तृतीयांश बहुमत आवश्यक असते. गेल्या एप्रिलमध्ये लोकसभेत ५२८ सदस्य होते. त्यामुळे हे विधेयक मंजूर होण्यासाठी ३५२ मतांची गरज होती. परंतु, विधेयकाला आवश्यक मतांपेक्षा ५४ मते कमी पडली होती. त्यानंतर सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित विधेयक पुन्हा मांडण्याची तयारी सुरू केली आहे. नवीन विधेयक मांडले जाण्याच्या वृत्तामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी सत्ताधारी आघाडीकडे दोन तृतीयांश बहुमत आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
विरोधकांची भूमिका काय?
विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दावा केला आहे की, अजेंडा जाहीर झाला नसला तरी या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मांडले जाईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर संसद चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी लिहिले की, त्यांचे मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक म्हणजे संसद चोरीचा एक प्रकारच असेल, यात शंका नाही. आम्ही हे विधेयक मंजूर होऊ देणार नाही. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानामुळे या चर्चेला आणखी जोर आला आहे. त्या म्हणाल्या, देशाच्या हिताचा विषय असेल, तर त्यावर सर्वांचे एकमत होऊ शकते. पण, आम्हाला अद्याप याबद्दल काहीही माहिती नाही. आधी विधेयक तर येऊ द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा