भारतातील सर्वात गरीब राज्य असलेल्या बिहारमध्ये एका राजकारण्याच्या मुलीच्या विवाहाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भव्य सोहळे आणि मोठ्या थाटामाटामुळे हा विवाह प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी आला आहे. बिहारचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी सिंह हिचा विवाह बुधवारी, २५ नोव्हेंबर रोजी पार पडला. अनेक दिवसांपासून या लग्नाचे भव्य कार्यक्रम सुरू होते. बुधवारी झालेल्या विवाह समारंभाला लाखो लोक उपस्थित होते. यामध्ये बिहार विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यातील तसेच देशातील इतर अनेक बडे नेतेही सहभागी झाले होते. पाटणा या राजधानीच्या शहरापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नदवां गावातील अनंत सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी हा सोहळा पार पडला.
५ लाख लोक, ६ हेलिपॅड, १५० हून अधिक पदार्थ
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लग्नाला सुमारे ५ लाख लोक उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. पाटण्याकडे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या रस्त्यांवर अनेक तास वाहतुकीची कोंडी झाली होती. महत्त्वाच्या पाहुण्यांसाठी गावात ६ हेलिपॅड उभारण्यात आले होते. शेकडो आचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वयंपाकघरांमध्ये १५० हून अधिक प्रकारचे पदार्थ बनवले होते. यात ८० लाख मिठाईच्या नगांचाही समावेश होता. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पत्रकार परिषदेत मोकामा मतदारसंघाचे ५ वेळा आमदार राहिलेले अनंत सिंह म्हणाले होते, केवळ बिहारमधीलच नव्हे, तर संपूर्ण भारत आणि पाकिस्तानमधील लोकांनाही लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
घोड्यांची शर्यत का रद्द झाली?
बुधवारी झालेल्या लग्नातील सर्वात मोठे आकर्षण घोड्यांची शर्यत होती. त्यासाठी ५२ घोडे आणण्यात आले होते. पण, ही शर्यत ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. अनेकजण थेट शर्यतीच्या मैदानात शिरले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. लग्नाआधी घोड्यांच्या शर्यतीच्या सरावाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो लोक जमल्याचे या व्हीडिओत दिसत होते. चांगले दिसावे म्हणून शेकडो लोक विजेच्या खांबावरही चढून बसले होते. मागील आठवड्यात आमदार अनंत सिंह यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक व्हीडिओ शेअर केला होता. त्यात एक पांढरी एसयूव्ही कार दाखवण्यात आली होती. या कारची किंमत १० ते २० लाख रुपये होती. घोड्यांच्या शर्यतीतील विजेत्याला ही कार बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला मोटारसायकल, तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला स्कूटर देण्यात येणार होती. नंतर ही शर्यत गुरुवारी घेण्याचे नियोजन करण्यात आले.
प्रतिक्रिया व्यक्त करा