एका व्यक्तीसाठी सुट्टी घालवण्याचे ठिकाण असलेली जागा दुसऱ्या व्यक्तीचे घर आणि उपजीविकेचे साधन असते. या दोन विश्वांचा संघर्ष झाला, तर काय घडू शकते, याचा वेध ‘अ फ्यू डेज इन द सन’ या द्वैभाषिक थरारपटातून घेण्यात आला आहे. गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या चमूने या कथेविषयी माहिती दिली.
मेक्सिकोच्या रिव्हिएरा माया भागात एका विकास प्रकल्पासाठी स्थानिक समुदायाला जमीन सोडण्यास भाग पाडणारे श्रीमंत युरोपीय जोडपे आणि आपल्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याशी जोखमीचा करार करणारे कामगारवर्गीय मेक्सिकन कुटुंब, अशा दोन भिन्न जगांची कथा चित्रपटात उलगडते. दोन्ही कुटुंबांचे उद्देश एकमेकांना छेद देऊ लागतात आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. अधिकार आणि जगण्याचा संघर्ष माणसांना अपेक्षेपेक्षा अधिक जवळ आणू शकतो, ही चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना आहे.
पाच देशांची सहनिर्मिती
इंग्रजी आणि स्पॅनिश भाषांतील या चित्रपटाची निर्मिती मेक्सिको, डॉमिनिकन रिपब्लिक, जर्मनी, अमेरिका आणि स्वित्झर्लंड या पाच देशांच्या सहनिर्मितीतून झाली आहे. दिग्दर्शक माउरो मुलर यांनी स्वित्झर्लंडमधील बालपण तसेच मेक्सिको आणि अमेरिकेतील वास्तव्याचा चित्रपटाच्या कथानकावर प्रभाव पडल्याचे सांगितले. विविध देशांत प्रवास करून तेथे राहिल्याने जगण्याची एकच पद्धत नसते, हे समजते. वेगवेगळ्या संस्कृतींतील लोकांचे निर्णय आणि त्यांच्या सभोवतालच्या सामाजिक व्यवस्था यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी हा अनुभव महत्त्वाचा ठरतो, असे त्यांनी नमूद केले.
मुलर यांच्या ‘द जॅनिटर’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर नोव्हेंबर २०२५ मध्ये गोव्यात झालेल्या ५६ व्या इफ्फीमध्ये झाला होता. लेखक गार्सिया यांनी चित्रपटातील सांस्कृतिक आणि सामाजिक वर्गांमधील संघर्ष अधोरेखित केला. श्रीमंत वर्गाने घेतलेल्या निर्णयांचे परिणाम अनेकदा त्यांच्या आयुष्यावर फारसे होत नाहीत; मात्र त्याच निर्णयांमुळे कामगारवर्गीय कुटुंबांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, असे त्यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराचे विविध स्तर आणि नैतिक पेच
निर्माती हॉलरन यांनी भ्रष्टाचाराच्या विविध स्तरांकडे लक्ष वेधले. लाचखोरीच्या स्वरूपातील थेट भ्रष्टाचार आणि सत्ता व राजकारणाशी जोडलेले जमिनीवरील अतिक्रमण यांतील विरोधाभास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. गरीब व्यक्तीची एखादी छोटीशी चूकही तिच्यासाठी गंभीर परिणाम घडवू शकते, असे त्या म्हणाल्या.
लोक नैतिकदृष्ट्या संदिग्ध निर्णय का घेतात, याविषयी प्रेक्षकांमध्ये सहानुभूती निर्माण करणे हा चित्रपटाचा उद्देश असल्याचे मुलर यांनी सांगितले. अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत विषय पोहोचवण्यासाठी थरारपट शैलीची निवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा चित्रपट कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांच्या सीमारेषेवरील पात्रप्रधान थरारपट ठरतो, असे ते म्हणाले.
हॉलरन यांनी चित्रपटाचे वर्णन महिला-केंद्रित असे केले. दोन्ही कुटुंबांतील महिलांचे निर्णय आणि त्यांच्यातील परस्परसंबंध कथेला दिशा देतात, असे त्यांनी सांगितले. विविध देशांतील कलाकार व निर्मात्यांसोबत काम करताना अनोळखी ठिकाणांचा शोध घेणे आणि नव्या संस्कृती समजून घेणे हा निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाचा अनुभव ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
समाजातील विविध वर्गांच्या संघर्षाशी प्रत्येक प्रेक्षक स्वतःला जोडू शकतो, असे गार्सिया यांनी सांगितले. विशेषाधिकारांमध्ये फरक असला तरी दोन्ही बाजू समान पेचप्रसंगांना सामोऱ्या जातात. त्यामुळे परस्परांना वेगळे मानण्यापेक्षा एकमेकांना समजून घेण्याचे आवाहन हा चित्रपट करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन लाभ जैन यांनी केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा