दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एका छोट्या चाहत्याने भर कार्यक्रमात विजय यांच्या गालावर किस केले. या अनपेक्षित कृतीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहून अनेकजण खुश झाले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
२६ नोव्हेंबर रोजी चेन्नईमध्ये ‘टीव्हीके एज्युकेशन अवॉर्ड्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नीलंकरई येथील आरके कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एक लहान मुलगा विजय यांच्याजवळ आला. या मुलाने आधी मुख्यमंत्र्यांचे अभिवादन केले आणि त्यानंतर त्यांच्या गालावर किस केले. तसेच, हाताने एक अॅक्शन किंवा पोझ द्यायला सांगितली. या अनपेक्षित कृतीमुळे विजय काही क्षण आश्चर्यचकित झाले. पण लगेचच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. त्यांनी काही वेळ त्या मुलाशी संवाद साधला आणि मग कार्यक्रमाला सुरुवात केली.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आणि टीव्हीके एज्युकेशन अवॉर्ड्स
मुख्यमंत्र्यांनी मुलाच्या कृतीला दिलेल्या प्रेमळ प्रतिसादामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर हार्टचे इमोजी पोस्ट करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या राजकीय पक्षाकडून दरवर्षी ‘टीव्हीके एज्युकेशन अवॉर्ड्स’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तामिळनाडूमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या माध्यमातून गौरव केला जातो. २०२३ मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली असून २०२६ मध्ये या कार्यक्रमाचे चौथे वर्ष आहे. या सोहळ्यात विविध विधानसभा मतदारसंघांतील गुणवंत विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना बक्षिसे देऊन त्यांना सन्मानित केले जाते. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणार्या विजय यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर चित्रपटसृष्टीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. एच. विनोथ दिग्दर्शित ‘जना नायकन’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.
प्रतिक्रिया व्यक्त करा