महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील क्रांतिकारी विचारवंत, शिक्षणप्रेमी, समाजसुधारक आणि मानवतावादी नेते होते. २८ नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने भारतीय समाजाला समतेची नवी दिशा दिली.
ज्योतिराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. कुटुंबाचा फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांना ‘फुले’ हे आडनाव मिळाले. शिक्षण घेत असताना समाजातील अन्यायकारक रूढी, परंपरा आणि विषमतेच्या व्यवस्थेविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. याच प्रश्नांनी त्यांच्या सामाजिक कार्याला दिशा दिली. एका ब्राह्मण मित्राच्या विवाहाच्या वरातीत त्यांना जातीमुळे अपमानास्पद वागणूक मिळाली. या अपमानातूनच त्यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा घेतली.
स्त्री-शिक्षण आणि विधवांच्या प्रश्नांसाठी कार्य
ज्या काळात स्त्रियांना शिक्षण देण्याची कल्पनाच अनेकांना मान्य नव्हती, त्या काळात ज्योतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. पत्नी सावित्रीबाई यांना त्यांनी शिकवले. फुले दाम्पत्याने उभे केलेले हे कार्य भारतीय स्त्री-शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व ठरले. फुलेंनी विधवांच्या प्रश्नांकडेही संवेदनशीलतेने लक्ष दिले. बालविवाह, अल्पवयात वैधव्य, विधवांचे केशवपन आणि त्यांच्यावर लादल्या जाणाऱ्या सामाजिक बंधनांमुळे अनेक स्त्रियांचे जीवन यातनामय होते. १८६३ मध्ये त्यांनी गर्भवती विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सामाजिक बदनामीच्या भीतीने नवजात बालकांची हत्या करण्यास भाग पडणाऱ्या स्त्रियांना तेथे सुरक्षित आश्रय मिळाला. एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे संगोपनही त्यांनी केले.
सत्यशोधक समाज आणि लेखन
जातिभेद आणि अस्पृश्यतेच्या अमानुष प्रथांविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. १८६८ मध्ये त्यांनी घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. ही कृती अत्यंत धाडसी आणि परिवर्तनकारी होती. जन्माच्या आधारावर श्रेष्ठ-कनिष्ठ ठरविण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. बहुजन, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांना त्यांच्या शोषणाची जाणीव व्हावी, त्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी संघटित व्हावे आणि विवेकाच्या आधारावर समाजजीवनाची पुनर्रचना करावी, अशी त्यांची भूमिका होती. या विचारांना संघटित स्वरूप देण्यासाठी त्यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाने जातीय वर्चस्व, पुरोहितशाही, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेला विरोध केला. विवाह विधींमध्ये पुरोहितांवरील अवलंबित्व कमी करून साध्या आणि खर्चिक कर्मकांडांपासून मुक्त पद्धतीने विवाह करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
महात्मा फुले प्रभावी लेखक आणि विचारवंतही होते. १८५५ मध्ये त्यांनी ‘तृतीय रत्न’ या नाटकातून शिक्षणाचा अभाव आणि अज्ञानामुळे सामान्य माणसाचे होणारे शोषण अधोरेखित केले. १८७३ मध्ये ‘गुलामगिरी’ या ग्रंथातून त्यांनी शोषणव्यवस्थेवर कठोर टीका केली. ‘ब्राह्मणांचे कसब’ या लेखनातून पुरोहितशाहीद्वारे सामान्य लोकांची होणारी फसवणूक उघड केली. ‘शेतकऱ्याचा आसूड’ या १८८३ मध्ये प्रकाशित ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणावर परखड भाष्य केले. पुणे नगरपालिकेच्या कामकाजात सहभागी असताना पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि सामान्य नागरिकांच्या हिताच्या प्रश्नांना त्यांनी महत्त्व दिले. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथातून नैतिकता, सत्य, समता आणि मानवकल्याण यांवर आधारित जीवनदृष्टी त्यांनी मांडली. १८८८ मध्ये मुंबई येथे एका सार्वजनिक समारंभात त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी प्रदान करण्यात आली. पुणे येथे २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले.
महात्मा फुले यांनी मांडलेला शिक्षणाचा अधिकार, जातिभेदाचा विरोध, स्त्री-स्वातंत्र्य आणि शेतकरी हिताचा विचार पुढील सामाजिक चळवळींसाठी प्रेरणादायी ठरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना वैचारिक गुरू मानले. फुले-शाहू-आंबेडकर ही सामाजिक परिवर्तनाची परंपरा भारतीय समाजाला समतेच्या दिशेने नेणारी महत्त्वपूर्ण विचारधारा ठरली. आजही महात्मा फुले यांचा शिक्षणविषयक विचार नव्या संदर्भात समजून घेण्याची गरज आहे. समाजाने स्त्रीकडे समान अधिकार असलेल्या स्वतंत्र व्यक्तीच्या रूपात पाहणे, हीच महात्मा फुले यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा