कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना मानवी क्षमतांना पर्याय निर्माण करण्याऐवजी त्या अधिक सक्षम करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले. शासनाच्या निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सहायक म्हणून व्हावा, मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना मानवी हस्तक्षेप आणि पडताळणी अनिवार्य असावी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सार्वजनिक हित, जबाबदारी आणि सुशासनाच्या तत्त्वांवर आधारित असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत झालेल्या एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.
महा एआय आणि डिजिटल सार्वजनिक व्यवस्था
शासनाच्या कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे महत्त्व स्पष्ट करताना ब्रिजेश सिंह यांनी महाराष्ट्र शासनाच्या महा एआय या स्थानिक पातळीवर होस्ट केलेल्या सर्वम मॉडेलचा अनुभव सांगितला. मसुदा तयार करताना या मॉडेलची मदत घेतली असता शासन निर्णय, पूर्वीचे संदर्भ, प्रशासकीय तरतुदी, खर्चाच्या मर्यादा आणि विविध भाषांमधील जनसंपर्काचे स्वरूप यांची माहिती उपलब्ध होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना संदर्भ शोधणे आणि प्राथमिक मसुदा तयार करणे सोपे होते. मात्र अंतिम मसुद्याची पडताळणी आणि मान्यता अधिकाऱ्यांनीच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
डिजिटायझेशनपासून डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांपर्यंतच्या भारताच्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी आधार, यूपीआय आणि डिजीयात्रा यांसारख्या सुविधांचे उदाहरण दिले. ही व्यवस्था जागतिक स्तरावर आदर्श ठरली असून आता त्यावर संमती आधारित व्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवहार प्रणाली विकसित करण्याची संधी भारतासमोर असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सर्विस नाऊच्या वरिष्ठ संचालक गरिमा बब्बर, ओपन टेक्स्टचे देश संचालक मनीष बलूजा, डेलॉइट इंडियाचे भागीदार जय गुहा, गव्हकनेक्टचे संचालक फहीम हक तसेच केंद्र व राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रोजगार, रोबोडेब्टचा धोका आणि महा क्राइम ओएस
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या संधी कमी होण्याबाबत भूमिका मांडताना भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात मानवी श्रम आणि कौशल्यांना महत्त्व असल्याचे ते म्हणाले. डार्क फॅक्टरी किंवा चालकविरहित वाहनांसारख्या संकल्पनांचा स्वीकार करताना देशाच्या सामाजिक आणि आर्थिक गरजांचा विचार करणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने माणसाची जागा घेण्याऐवजी कामाची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता वाढवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातील संभाव्य धोके स्पष्ट करताना त्यांनी ऑस्ट्रेलियातील रोबोडेब्ट प्रकरणाचा दाखला दिला. कल्याणकारी योजनांमधील लाभार्थ्यांची स्वयंचलित पडताळणी करताना प्रणालीतील त्रुटींमुळे चुकीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आणि अखेर ही प्रक्रिया बंद करावी लागली. त्यामुळे महत्त्वाचे शासकीय निर्णय पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवणे धोकादायक ठरू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेल्या निष्कर्षांची मानवी स्तरावर पडताळणी करूनच निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या महा क्राइम ओएस या प्रायोगिक उपक्रमाची माहिती देताना वाहनचोरी, घरफोडी आणि पाकीटमारी यांसारख्या गुन्ह्यांच्या कार्यपद्धतींचे विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले. या प्रणालीद्वारे माहितीच्या आधारे उत्तरे मिळतात, मात्र त्यांची सत्यता तपासून पुढील जबाबदार निर्णय घेण्याची भूमिका मानवी अधिकाऱ्यांचीच असेल. शासकीय यंत्रणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना खरेदी, स्वदेशी अथवा परदेशी तंत्रज्ञानाची निवड, स्वतः प्रणाली विकसित करणे की उपलब्ध प्रणाली स्वीकारणे, संगणकीय क्षमता आणि संसाधनांचे नियोजन या बाबींचा जोखमीच्या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने, जोखमींचे मूल्यमापन करून आणि सार्वजनिक हिताला केंद्रस्थानी ठेवून करणे, हाच कृत्रिम बुद्धिमत्ता सुशासनाचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी भाषणाच्या शेवटी नमूद केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा