दुपारच्या जेवणात भात खाल्ल्यानंतर अनेकांना अचानक सुस्ती जाणवू लागते. डोळ्यांवर झोप येते, शरीर थकल्यासारखे वाटते आणि काही वेळ आराम करावा असे वाटते. विशेष म्हणजे, पोळी खाल्ल्यानंतर जेवढी झोप येत नाही, त्यापेक्षा भात खाल्ल्यानंतर अधिक सुस्ती जाणवते, असा अनेकांचा अनुभव आहे. यामागे केवळ पोट भरल्याचे कारण नसून रक्तातील साखरेची पातळी, इन्सुलिन आणि शरीरातील काही हार्मोन्स यांचाही संबंध आहे.
रक्तातील साखर आणि इन्सुलिनची भूमिका
भातामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. विशेषतः पांढरा भात लवकर पचतो आणि त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी वाढते. ही पातळी नियंत्रित करण्यासाठी स्वादुपिंडातून इन्सुलिन नावाचे हार्मोन स्रवते. रक्तातील साखरेच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे काही लोकांना थकवा आणि सुस्ती जाणवू शकते.
झोपेच्या हार्मोन्सचाही संबंध
भात खाल्ल्यानंतर झोप येण्यामागे ट्रिप्टोफॅन या अमिनो आम्लाचाही संबंध असतो. इन्सुलिनच्या वाढीमुळे ट्रिप्टोफॅनला मेंदूपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. ट्रिप्टोफॅनपासून सेरोटोनिन तयार होते आणि पुढे सेरोटोनिनपासून मेलाटोनिन तयार होण्यास मदत होते. मेलाटोनिन हे झोपेचे नियमन करणारे हार्मोन आहे. त्यामुळे जेवणानंतर आराम किंवा झोप येऊ शकते.
केवळ भात खाल्ल्यामुळेच झोप येते असे नाही. आपल्या शरीराच्या जैविक घड्याळानुसार दुपारच्या वेळेत नैसर्गिकरीत्या सुस्ती जाणवू शकते. त्यामुळे दुपारचे जेवण केल्यानंतर झोप अधिक जाणवते. एकाच वेळी जास्त भात खाणे टाळावे आणि भातासोबत डाळ, दही किंवा पनीरसारखे प्रथिनयुक्त पदार्थ घ्यावेत, असा सल्ला दिला जातो.
प्रतिक्रिया व्यक्त करा