हिवाळा सुरू झाला की सकाळी अंघोळ करण्याचा कंटाळा अनेकांना येतो. थंड वातावरणात उब मिळावी यासाठी अनेक जण गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र हिवाळ्यात रोज गरम पाण्याने अंघोळ करणे आणि साबणाचा अतिवापर करणे त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या वाढते. अशा वेळी त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी अंघोळीच्या सवयींमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे.
## गरम पाण्याने अंघोळ का टाळावी?
हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे त्वचा आधीच कोरडी होण्याची शक्यता असते. त्यात रोज गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचा ओलावा आणखी कमी होतो. त्यामुळे त्वचेवर खाज येणे, त्वचा ताणल्यासारखी वाटणे, लालसरपणा आणि काही ठिकाणी त्वचा फाटण्याची समस्या जाणवू शकते. विशेषतः ज्यांची त्वचा आधीपासून संवेदनशील किंवा कोरडी आहे, त्यांनी अंघोळीच्या सवयींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
रोज अंघोळ करताना खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. जास्त वेळ पाण्याखाली राहिल्याने त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. तसेच साबणाचा अतिवापर आणि त्वचा जोरात घासणे टाळा.
## अंघोळीनंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी?
त्वचेला त्रास न देणारा सौम्य साबण किंवा बॉडी वॉश वापरणे फायदेशीर ठरू शकते. अंघोळीनंतर त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. टॉवेलने त्वचा जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने पुसा. त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्वचेवर सतत खाज, लालसरपणा किंवा भेगा पडत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा