बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. झहीर खान याला भेटल्यानंतर तिने त्याच्यासोबत लग्न केले. मात्र अनेक वर्षे दोघांनी आपले नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. कोल्हापूरच्या राजघराण्याची लेक असलेल्या सागरिकाशी लग्न करणे झहीर खानसाठी सोपे नव्हते. नुकतीच सागरिका हिने सानिया मिर्झाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रेमकथेबद्दल सांगितले.
मित्राच्या पार्टीत पहिली भेट
झहीर आणि सागरिका यांची पहिली भेट एका मित्राच्या पार्टीत झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि भेटीगाठी वाढत गेल्या. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र अनेक वर्षे त्यांनी हे नाते सर्वांपासून लपवून ठेवले. त्यांनी २३ नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरेज केले आणि मुंबईत दणक्यात रिसेप्शन ठेवले.
घरच्यांची प्रतिक्रिया आणि वडिलांची चौकशी
हा प्रवास मात्र इतका सोपा नव्हता. सागरिका कोल्हापूर घराण्याची लेक असून तिचे आजोबा आणि वडील राजघराण्यातील आहेत. झहीरबद्दल तिने घरी पहिल्यांदा सांगितले तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया सर्वसामान्य कुटुंबासारखीच होती, पण लेकीसाठी त्यांनी सर्व गोष्टी मान्य केल्या. तिच्या वडिलांनी सर्वांत आधी झहीरची पूर्ण माहिती काढली. माहिती काढण्यासाठी त्यांनी झहीरच्या ट्रेनरला फोनही केला होता. झहीर जेव्हा वडिलांना पहिल्यांदा भेटला तेव्हा त्यांनी त्याला कसे वागायचे, काय करायचे आणि काय नाही, याची मोठी यादीच दिली. आपल्या पाठीमागे तिच्या वडिलांनी चौकशी केल्याचे आपल्याला उशिरा समजले, असे झहीरने म्हटले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा