२०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी रायगडमध्ये आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून युवा नेत्याला मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
या चर्चेनुसार युवा नेते भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे नाव पुढे येत आहे. २०२९ च्या निवडणुकीत विकास गोगावले हे शिवसेनेकडून उमेदवार असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पक्षांतर्गत हालचालींना वेग आल्याचे सांगितले जात आहे. दरे गावातील भेटीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी विकास गोगावले यांना निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा सल्ला दिल्याची माहिती समोर येत आहे.
वडील आणि गॉडफादर यांची साथ
विकास गोगावले यांच्या संभाव्य उमेदवारीसाठी त्यांचे वडील आणि गॉडफादर दोघेही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रायगडमध्ये निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नवी रणनीती आखली जात असून विकास गोगावले यांनी आतापासूनच मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते.
२०२४ चा निकाल आणि २०२९ चे समीकरण
२०२४ मध्ये रायगड मतदारसंघातून सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गिते यांचा पराभव केला होता. तटकरे यांनी ८२ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे २०२९ मध्ये ही जागा शिंदे गट लढवणार का, महायुतीमधील जागावाटपाचे समीकरण कसे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्यातरी शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा