चंद्रपुरातून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते ललित कासट यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उइके यांच्या विरोधात त्यांनी हटाव अभियान सुरू केले होते. सत्तेत असतानाही पालकमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेणे त्यांना महागात पडले. पक्षाकडून हकालपट्टीची ताकीद मिळाल्यानंतर कासट यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
पट्टे काढून राजीनाम्याची घोषणा
ललित कासट आणि त्यांच्या समर्थक शिवसैनिकांनी गळ्यातील शिवसेनेचे पट्टे काढून राजीनाम्याची घोषणा केली. पक्षाचे नाव आणि बॅनर आपण कधीही वापरले नसताना, आपल्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील नेत्यांनी वरिष्ठांकडे केल्या, असे कासट यांनी सांगितले. त्यामुळे आपल्याला हकालपट्टीची ताकीद देण्यात आली, असेही ते म्हणाले. मात्र पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेविरोधात सुरू केलेले आंदोलन आपण थांबवणार नाही, त्यामुळे पक्षाचा राजीनामा देत असल्याचे कासट यांनी जाहीर केले. पालकमंत्र्यांच्या विरोधातील आंदोलन पुढेही सुरू राहील, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
पुढील भूमिका काय?
शिंदेंची शिवसेना सोडल्यानंतर ललित कासट आता कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार, यावरून चर्चा सुरू झाली आहे. मात्र कासट यांनी कोणत्या पक्षाची साथ धरणार, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
दरम्यान, पुण्यातील देवराम लांडे प्रकरणात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने कठोर भूमिका घेतली आहे. पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर लांडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर लांडे यांनी कार्यालयात जाऊन माफी मागितली. या प्रकरणात कोणत्याही अनुचित प्रकाराचे पक्ष समर्थन करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीने घेतली आणि त्यानंतर लांडे यांचा राजीनामा घेण्यात आला.
प्रतिक्रिया व्यक्त करा