मृत्यू कुणालाच टळत नाही आणि तो कधी येईल हेही कुणी सांगू शकत नाही. म्हणूनच अनेकजण आधीच मृत्यूपत्र करतात आणि संपत्तीचं वाटप करून टाकतात, जेणेकरून मागे वाद होऊ नयेत. पण जिवंत असतानाच आपल्या अंतिम संस्काराचं बुकिंग करणं, हे ऐकायला अजब वाटतं. दिल्लीत मात्र हाच प्रकार सुरू झाला आहे. ‘संस्कार सेवा’ या स्टार्टअपने जिवंतपणीच अंतिम संस्काराचं बुकिंग करण्याची सुविधा सुरू केली आहे.
प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. अशावेळी अंतिम संस्काराची व्यवस्था कशी करायची, घाट, पंडित, पूजेचं साहित्य आणि वाहनं कुठून आणायची, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. सगळेच दुःखात असतात. हाच त्रास कमी करण्यासाठी ही अॅडव्हान्स बुकिंग सेवा सुरू झाली आहे. आपल्या निधनानंतर कुटुंबाला ही व्यवस्था करण्यात अडचण येऊ नये, हाच यामागचा हेतू आहे. या कंपनीचे संचालक विश्व कंदर्प यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत ३०० हून अधिक जणांनी या सेवेत बुकिंग केलं आहे. अनेकांनी जिवंतपणीच ही बुकिंग केल्याचं कंदर्प यांनी सांगितलं.
तीन पॅकेजेस, काय काय समाविष्ट?
लोकांना त्यांच्या बजेटनुसार पर्याय मिळावा म्हणून तीन वेगवेगळी पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. २९,९९९ रुपयांचं बेसिक पॅकेज, ६९,९९९ रुपयांचं मध्यम पॅकेज आणि १.४९ लाख रुपयांपर्यंतचं प्रीमियम पॅकेज उपलब्ध आहे. या पॅकेजमध्ये अंतिम संस्काराशी संबंधित सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींची पूर्तता केली जाणार आहे. पार्थिव शरीर नेण्यासाठी शववाहन, तिरडी, पंडित, पूजेचं सर्व साहित्य आणि फुलांची सजावट यांचा यात समावेश आहे.
एकटं राहणाऱ्यांसाठी मोठा आधार
अस्थि एकत्र करणं, विसर्जनासाठी नाव आणि घाटाची व्यवस्था, तसंच श्राद्ध आणि शांतीपाठ यांसारखे सर्व धार्मिक विधी सन्मानपूर्वक पार पाडण्याची जबाबदारी ही सेवा घेणार आहे. एकटं राहणाऱ्या लोकांसाठी ही सेवा मोठा आधार ठरणार आहे. काही जणांची मुलं परदेशात राहतात आणि त्यांना भारतात येणं शक्य नसतं. अशावेळी आपल्या प्रिय व्यक्तीला सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरते, असंही सांगण्यात आलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा