वर्षभरातील सर्वात मोठ्या खरेदीच्या दिवसांपैकी एक म्हणून ब्लॅक फ्रायडे ओळखला जातो. आकर्षक सवलती, मर्यादित वेळेच्या ऑफर्स आणि फ्लॅश सेलच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीसाठी प्रवृत्त केले जाते. मात्र यंदा या सेलच्या दिवशी तरुण पिढी, विशेषतः जनरेशन झी, खरेदीपासून दूर राहताना दिसत आहे. खरेदी करण्याऐवजी तरुणाई नो-बाय चॅलेंज या नव्या ट्रेंडकडे वळली आहे.
नो-बाय चॅलेंज म्हणजे नेमकं काय?
नाव ऐकताच या चॅलेंजमध्ये कोणतीही खरेदी करायची नाही, असा समज होऊ शकतो. मात्र प्रत्यक्षात याचा अर्थ प्रत्येक खर्चावर बंदी घालणे असा नाही. आपल्या गरजा आणि हौस यांमधला फरक ओळखून विचारपूर्वक खर्च करण्याची ही एक पद्धत आहे. या चॅलेंजमध्ये ठरावीक कालावधीसाठी केवळ आवश्यक गोष्टींवरच पैसे खर्च करण्याचा नियम पाळला जातो. घरभाडे, किराणा, प्रवास, औषधे किंवा दैनंदिन गरजांसाठी खर्च करण्यास कोणतीही मनाई नसते. मात्र कपाटात आधीच भरपूर कपडे असताना आणखी एक ड्रेस घेणे, केवळ ट्रेंडमध्ये आहे म्हणून महागडे शूज खरेदी करणे किंवा घरात जागा नसतानाही सजावटीच्या वस्तू मागवणे टाळले जाते. थोडक्यात, गरज नसलेल्या खरेदीला ब्रेक लावून बचतीला प्राधान्य देणे, हा या चॅलेंजचा मुख्य उद्देश आहे.
तरुणाई का वळतेय या ट्रेंडकडे?
आजच्या डिजिटल युगात खरेदी करणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. एका क्लिकवर किंवा यूपीआय स्कॅन करताच पैसे खर्च होतात. त्यामुळे छोट्या-छोट्या खरेदींचा एकत्रित परिणाम किती मोठा होतो, याचा अनेकदा अंदाजही येत नाही. महिन्याच्या सुरुवातीलाच ऑनलाइन शॉपिंग, बाहेरचे खाणे आणि वेगवेगळ्या गोष्टींवर पैसे खर्च होतात. मात्र महिन्याचा मध्य येईपर्यंत बँक बॅलन्स कमी झालेला दिसतो. हीच जाणीव आता तरुणांना आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देत आहे. महागाई वाढत असताना केवळ दिखाव्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा भविष्यासाठी बचत करणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना जनरेशन झीमध्ये वाढताना दिसत आहे.
सोशल मीडियामुळे आता किंमतींची तुलना करणे, रिव्ह्यू तपासणे आणि उत्पादनाचा आधीचा दर पाहणे सोपे झाले आहे. त्यामुळे केवळ सवलत दिसते म्हणून खरेदी करण्यापेक्षा खरोखर गरज आहे का, याचा विचार तरुणाई करू लागली आहे. काही काळापूर्वी सोशल मीडियावर मोठमोठ्या शॉपिंग बॅग्स, कपड्यांचे ढीग आणि महागड्या वस्तू दाखवणारे शॉपिंग हॉल व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय होते. मात्र आता या ट्रेंडला पर्याय म्हणून किमानवाद आणि साधेपणाला महत्त्व दिले जात आहे. अनेकदा कंटाळा, ताण किंवा मूड चांगला करण्यासाठी ऑनलाइन शॉपिंग केली जाते. ऑर्डर येईपर्यंत उत्सुकता असते; वस्तू हातात आल्यानंतर मात्र काही दिवसांतच त्यातील आकर्षण कमी होते. शेवटी घरात न वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा साठा आणि खर्च केल्याची खंत उरते. हीच गोष्ट लक्षात घेऊन तरुणाई आता कमी वस्तू खरेदी करणे, उपलब्ध वस्तूंचा अधिकाधिक वापर करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे याला महत्त्व देत आहे. कमी वस्तूंमध्येही समाधान शोधण्याची ही मानसिकता सोशल मीडियावर चर्चेत आहे. नो-बाय चॅलेंज म्हणजे कंजूषपणा नव्हे, तर आर्थिक स्वातंत्र्याकडे टाकलेले एक पाऊल असल्याचे मानले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा