आपल्या घरात पडून असलेल्या जुन्या मोबाईल फोनमध्ये सोन्याचा मोठा साठा दडलेला असू शकतो. इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर केला, तर नैसर्गिक खनिज उत्खननावरील अवलंबित्व कमी करता येऊ शकते. पण जुन्या फोनमधून सोने काढणे नेमके किती शक्य आहे, याबाबत काही महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे.
सोन्याचे प्रमाण अधिक असलेल्या एका खाणीच्या एक टन खनिजातून साधारण एक ते दोन ग्रॅम सोने मिळते. त्याच्या तुलनेत एक टन जुन्या मोबाईल फोनमधून सुमारे ३०० ग्रॅम सोने मिळू शकते, असे तंत्रज्ञान कंपनी उमिकोरचे म्हणणे आहे. यात बॅटरीचा समावेश नाही. सुमारे ३५ ते ४१ मोबाईल फोनमधून एक ग्रॅम सोने मिळू शकते. मात्र एका मोबाईल फोनमधून काढलेल्या सोन्याची किंमत एक पौंड म्हणजेच १.६७ डॉलरपेक्षाही कमी असते.
प्रक्रिया फायदेशीर, पण नफा मर्यादित
मोबाईलमधून सोने वेगळे करण्याची प्रक्रिया व्यापारीदृष्ट्या फायदेशीर असली, तरी त्यातून मिळणारा नफा मर्यादित आहे. कचऱ्यातील मौल्यवान धातू आणि साहित्याचा पुनर्वापर करून चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर युरोपियन युनियनने भर दिला आहे.
जगाच्या गरजेसाठी किती फोन लागतील?
जगभरात खाणकामातून दरवर्षी सुमारे २,७०० टन सोन्याचे उत्पादन होते. जगाची सोन्याची गरज भागवण्यासाठी दररोज सुमारे ३० कोटीहून अधिक जुने मोबाईल फोन रिसायकल करावे लागतील. सध्या जगभरात वापरात असलेले अंदाजे सात अब्ज मोबाईल फोन दररोज रिसायकल केले, तर अवघ्या २३ दिवसांत हा साठा संपेल. इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात सोने आणि चांदी यांसारखे मौल्यवान धातू वापरलेले असतात. त्यामुळे जुन्या मोबाईल फोनचा कचरा म्हणून नाश करण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा