आठव्या केंद्रीय वेतन आयोगाकडून देशभरातील लाखो पेन्शनधारकांना मोठ्या अपेक्षा आहेत. या पार्श्वभूमीवर फोरम ऑफ सिव्हिल पेन्शनर्स असोसिएशन्स या पेन्शनधारकांच्या संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करून ११ महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. हे निवेदन २५ नोव्हेंबर २०२६ रोजी देण्यात आले. निवेदनात जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये समान सुधारणा आणि महागाई भत्ता व महागाई दिलासा यांचे ५० टक्के मूळ वेतन व पेन्शनमध्ये विलिनीकरण अशा मुद्द्यांचा समावेश आहे.
१ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही आठव्या वेतन आयोगाच्या पेन्शन सुधारणांचा लाभ मिळावा, ही संघटनेची प्रमुख मागणी आहे. केंद्र सरकारी कर्मचारी, रेल्वे, संरक्षण विभाग, बीएसएनएल, एमटीएनएल, बँका आणि स्वायत्त संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळावेत, यावरही निवेदनात भर देण्यात आला आहे. निवृत्तीची तारीख वेगळी आहे म्हणून समान पदावर आणि समान सेवाकाल पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव होऊ नये, अशी संघटनेची भूमिका आहे.
नेमक्या मागण्या कोणत्या?
फायनान्स अॅक्ट २०२५ च्या माध्यमातून लागू करण्यात आलेला व्हॅलिडेशन ऑफ पेन्शन रूल्स अॅक्ट, २०२५ हा कायदा पूर्णपणे रद्द करावा, अशी संघटनेने मागणी केली आहे. या कायद्यामुळे जुन्या आणि नव्या पेन्शनधारकांमध्ये भेदभाव निर्माण होत असल्याचा संघटनेचा दावा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक डी. एस. नाकरा निकाल कायम ठेवून सर्व पेन्शनधारकांना समान न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
१ जानेवारी २००४ किंवा त्यानंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यासोबतच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि युनिफाइड पेन्शन स्कीम बंद करण्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. तसेच आठव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत १ जानेवारी २०२६ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन सुधारणांचाही स्पष्टपणे समावेश करावा, अशी मागणी आहे.
पेन्शनधारकांच्या अपेक्षा का वाढल्या?
आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झाल्यापासून पेन्शनधारकांमध्ये पेन्शन सुधारणांबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. महागाई भत्ता आणि महागाई दिलासा मूळ वेतन व पेन्शनमध्ये विलीन केल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, असे संघटनेचे म्हणणे आहे. या निवेदनावर आता सरकार काय निर्णय घेते, याकडे देशभरातील लाखो पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा