बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच नाही, तर चाहत्यांना आणि बॉलिवूडलाही मोठा धक्का बसला. श्रीदेवी यांच्या निधनाची ती भयानक रात्र आजही कोणी विसरू शकत नाही. श्रीदेवी यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये अखेरचा श्वास घेतला. तेव्हा श्रीदेवी आणि पती बोनी कपूर कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी दुबईत गेले होते. तेव्हा रात्री हॉटेलच्या खोलीतील बाथटबमध्ये श्रीदेवी पडल्या आणि त्यांचे निधन झाले.
यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. यावर आता तत्कालीन भारतीय राजदूत नवदीप सिंग सूरी यांनी मोठा खुलासा केला आहे. तेव्हा कपूर कुटुंबियांची त्यांनी मदत केली होती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सूरी यांनी त्या रात्री नेमकं काय घडलं, याबाबत सांगितलं.
कोणतीही गडबड झाली नाही
नवदीप सिंग सूरी यांनी स्पष्ट केलं की, श्रीदेवी यांच्या शेवटच्या क्षणांदरम्यान कोणतीही गडबड झाली नाही आणि तसे कोणतेही ठोस पुरावेही समोर आले नाहीत. त्या वेळी सूरी हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे राजदूत होते. त्यांनी पार्थिव शरीर परत आणण्याच्या प्रक्रियेदरम्यान दुबईतील अधिकारी आणि श्रीदेवी यांच्या कुटुंबामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
सूरी यांनी सांगितलं की, जेव्हा त्यांना याबाबत समजलं, तेव्हा त्यांनी तात्काळ स्वतःचं वेळापत्रक बदललं, कारण या परिस्थितीत त्यांची गरज भासेल असे त्यांना वाटलं. त्यांना असं वाटत होतं की, यामध्ये एक मोठी घडामोड घडेल, त्यामुळे त्यांचा एक कार्यक्रम होता, तिथे जाणे त्यांनी पुढे ढकललं.
कुटुंबियांशी संपर्क साधला
त्यानंतर त्यांनी श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्यांना फोन केला. त्यावेळी सर्वांनाच मोठा धक्का बसलेला होता. भारतात पार्थिव कसं घेऊन जाणार, हाच प्रश्न सर्वांसमोर होता. सूरी यांनी सांगितलं की, तेव्हा तिथे सगळे बसले होते आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला होता.
श्रीदेवी यांच्या निधनानंतर सुमारे आठ वर्षांनी सूरी यांनी केलेल्या या खुलाशामुळे त्या रात्रीबाबतच्या चर्चांना आता एका प्रत्यक्षदर्शी अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण मिळाले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा