राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक महत्त्वाची नियुक्ती झाली आहे. पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनी पाच महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघे यांची मुंबई राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पार्थ पवार यांनी स्वतः मेघे यांना नियुक्तीचे पत्र दिले. या नियुक्तीमुळे पक्षात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची शक्यता वर्तवली जात आहे.
निकटवर्तीयांना पदे देण्याचा धडाका सुरूच
उमेश पाटील आणि झिशान सिद्धकी यांच्यानंतर पार्थ पवार यांनी आणखी एका निकटवर्तीयाची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांना महत्त्वाच्या पदांवर बसवण्याचा धडाका सुरूच असल्याचे चित्र पक्षात दिसत आहे. मधल्या काळात झिशान सिद्धकी आणि उमेश पाटील यांच्या परस्पर नियुक्त्या झाल्यामुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या नव्या नियुक्तीवरून पक्षात पुन्हा नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अर्जुन मेघे कोण आहेत
अर्जुन मेघे हे भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष राहिले आहेत. ते माजी मंत्री स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला होता. मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता. या पक्षप्रवेशाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा