उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल यांसारखे घटक हृदयविकाराशी संबंधित असल्याचे दीर्घकाळापासून मानले जाते. मात्र आता या घटकांसोबतच रक्तातील प्रथिनांचा अभ्यास केल्यास एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका तब्बल ३० वर्षे आधीच वर्तवता येऊ शकतो, असे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे.
जामा नेटवर्क ओपन या नियतकालिकात सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासात स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढवणाऱ्या घटकांचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. प्रत्यक्ष आजार उद्भवण्यापूर्वी ३० वर्षांपर्यंत रुग्णांच्या आरोग्यविषयक माहितीत या धोक्याची पूर्वसूचना देणारे संकेत दिसून येतात, असे संशोधकांना आढळून आले आहे. रक्तातील काही कमी अभ्यासलेल्या बायोमार्कर्सच्या माध्यमातून भविष्यातील संभाव्य आजारांचा अंदाज बांधणे सोपे होऊ शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
## दीर्घकालीन अभ्यासातून निष्कर्ष
या नवीन अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी सुमारे एक लाख १४ हजार निरोगी व्यक्तींच्या आरोग्यविषयक नमुन्यांचा तब्बल ३४ वर्षे मागोवा घेतला. अमेरिका, ब्रिटन आणि नॉर्वेमध्ये झालेल्या चार दीर्घकालीन आरोग्य अभ्यासांतील माहितीचा यात समावेश होता.
संशोधकांच्या पथकाने रक्ताभिसरणात फिरणाऱ्या आणि हृदयरोगाशी संबंधित असलेल्या बायोमार्कर प्रथिनांच्या बदलांचाही अभ्यास केला. यामध्ये कार्डियाक ट्रोपोनिन आणि एन-टर्मिनल प्रो बी-टाइप नॅट्रियुरेटिक पेप्टाइड, म्हणजेच एनटी-प्रोबीएनपी, यांचा समावेश आहे. हृदयाच्या स्नायूंच्या ऊतींना इजा झाल्यास ही प्रथिने रक्तात सोडली जातात आणि हृदयविकाराच्या झटक्याचे निदान करण्यासाठी यांचा वापर केला जातो. याशिवाय सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचाही यात समावेश होता. हा रेणू यकृतातून तयार होतो आणि शरीरात वाढणारी दाहक स्थिती दर्शवतो.
## तीस वर्षे आधी दिसणारे संकेत
पुढे जाऊन ज्यांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक आला, त्यांच्यामध्ये कार्डियाक ट्रोपोनिन आणि सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचे फरक तब्बल ३० वर्षे आधीच दिसून आले. तर एनटी-प्रोबीएनपीच्या बाबतीत हे फरक सुमारे १० वर्षे आधी समोर आले.
रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल हे हृदयरोगाशी निगडित सर्वश्रुत धोके आहेत, हे आपल्याला माहीत आहे, असे या अभ्यासाचे सह-लेखक आणि एडिनबर्ग विद्यापीठातील साथरोगतज्ज्ञ डोरियन किमेनाई यांनी सांगितले. मात्र हृदयविकाराशी संबंधित घटना घडण्यापूर्वी या जोखीम घटकांच्या नमुन्यांचा कोणीही पद्धतशीर अभ्यास केला नव्हता, असेही त्या म्हणाल्या. त्याच वेळी किमेनाई यांनी सावधगिरीचा इशारा दिला की, बायोमार्करची ही माहिती संपूर्ण अभ्यास गटातील सर्व सहभागींपेक्षा कमी लोकांकडून मिळाली आहे. त्यामुळे या निष्कर्षांचा आणखी अभ्यास आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा