हिवाळ्यात थंड हवेमुळे त्वचा कोरडी पडते आणि तिची नैसर्गिक चमक कमी होते. अशा वेळी त्वचेला योग्य तेल लावणे महत्त्वाचे ठरते. बदामाचे तेल आणि नारळाचे तेल हे दोन्ही पर्याय उपयुक्त असले, तरी त्वचेच्या प्रकारानुसार त्यांची निवड बदलते.
चेहऱ्याच्या आणि संवेदनशील त्वचेसाठी बदामाचे तेल अधिक चांगले ठरते. यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे थंडीमुळे निस्तेज झालेल्या त्वचेला नैसर्गिक चमक देते. डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि बारीक सुरकुत्या कमी करण्यासाठी हे चेहऱ्यावर लावणे सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. मात्र ज्यांना सुक्या मेव्याची अॅलर्जी आहे, त्यांनी बदामाचे तेल वापरू नये.
नारळाचे तेल कधी वापरावे?
शरीराच्या अति-कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल उत्तम पर्याय आहे. हे त्वचेवर एक संरक्षणात्मक थर तयार करते, ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो. थंडीत फुटलेल्या टाचा, कोरडे कोपर आणि खाज सुटणाऱ्या कोरड्या त्वचेवर हे अत्यंत गुणकारी आहे. मात्र तुमची त्वचा तेलकट किंवा मुरुमे येणारी असेल, तर चेहऱ्यावर नारळाचे तेल लावणे टाळावे.
संपूर्ण शरीरासाठी योग्य निवड
आंघोळीनंतर लगेच ओल्या त्वचेवर लावण्यासाठी व्हर्जिन कोकोनट ऑइल निवडावे, कारण ते स्वस्त आणि संपूर्ण शरीरासाठी अधिक प्रभावी ठरते. थोडक्यात, चेहरा आणि संवेदनशील त्वचेसाठी बदामाचे तेल, तर शरीराच्या कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल हा योग्य पर्याय ठरू शकतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा