पिंपरी-चिंचवड : मोशी परिसरातील बनकर वस्ती येथे शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या मामा आणि भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. रितेश रमेश ताकपेरे (वय १२ वर्षे) आणि सिद्धार्थ उत्तम लगडे (वय २१ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. एकीकडे बारा वर्षांचा चिमुरडा आणि दुसरीकडे त्याचाच मामा, अशा दोघांचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास ही घटना घडली. दोघेही शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिसांचे बीट मार्शल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने दोघांना शेततळ्यातून बाहेर काढून तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
शेततळ्यात पोहण्याचा मोह दोन जीवांवर बेतला असून, या घटनेने पुन्हा एकदा शेततळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेततळ्यांभोवती संरक्षक उपाययोजना नसल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेततळ्याजवळ पोहण्यासाठी जाणाऱ्या मुलांवर आणि तरुणांवर पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहनही या निमित्ताने करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा