नाशिक : वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान लवकरच दिले जाणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी नाशिकमध्ये ही माहिती दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे २० लाख नियमित कर्जदार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. नाशिकमध्ये १९ व्या आंतरराष्ट्रीय कृषिथॉन २०२६ प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली.
२० लाख शेतकऱ्यांना लाभाची अपेक्षा
राज्यातील सुमारे ३० लाख शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांच्या आत आहे. त्यापैकी नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २० लाखांच्या घरात असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. योजनेतील तरतुदीनुसार प्रोत्साहन अनुदान वितरित करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतीच्या वीजपुरवठ्याबाबत भूमिका
शेतीसाठी वीजपुरवठ्याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, शेतकऱ्यांना २४ तास वीज देणे सध्या शक्य नाही. मात्र कोणत्याही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी महावितरणने घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा