मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वेलणकर यांना जाहीर झाला आहे. यंदाचा पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता माहीम-माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे.
जागतिक रंगकर्मी दिवसाची परंपरा
व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून २५ नोव्हेंबर हा दिवस २०१४ या वर्षापासून ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ सन्माननीय रंगकर्मीला प्रदान केला जातो.
गेल्यावर्षी महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे हा सोहळा करण्यात आला नव्हता. त्यामुळे गेल्यावर्षी ज्येष्ठ रंगकर्मी वंदना गुप्ते यांना जाहीर झालेला पुरस्कार यंदाच्या कार्यक्रमात त्यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती मराठी नाट्य कलाकार संघाचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी दिली.
सोहळ्यातील कार्यक्रम
यावेळच्या कार्यक्रमात ज्ञानेश पेंढारकर यांचा सांगीतिक कार्यक्रम सादर होणार असून, त्यात ओंकार प्रभुघाटे व नुपूर गाडगीळ यांचे गायन होणार आहे. प्रदीप वेलणकर व वंदना गुप्ते यांची मुलाखतही यावेळी घेण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी करणार आहेत. मराठी नाट्य कलाकार संघ ही अखिल भारतीय नाट्य परिषदेची व्यावसायिक रंगभूमीवरील रंगकर्मींसाठी कार्य करणारी अधिकृत घटक संस्था आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा