छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या शौर्यगाथेचा साक्षीदार असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाचा गौरव आणि पर्यावरण संरक्षणाचा जागर घडला. ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष उपक्रमांतर्गत आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
आमदारांचे प्रतिपादन
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत संविधानातील मूल्यांची मुळे असल्याचे प्रतिपादन केले. सर्वांना समान न्याय, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि जलस्रोतांचे संवर्धन यांबाबत शिवाजी महाराजांनी त्या काळातच दूरदृष्टीने विचार मांडले होते. आज आपण हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनाबाबत चर्चा करतो; मात्र निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व शिवकालीन विचारांतही दिसून येते, असे त्यांनी सांगितले. भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक मूल्यांमुळे विविध धर्म आणि जातींचे नागरिक एकत्रितपणे देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी देणारे संविधान हे देशाच्या एकात्मतेचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाला मिळालेल्या संविधानामुळे प्रत्येक समाजघटकाला समानता, न्याय आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यात संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाची घोषणा करून संविधानाच्या सन्मानाची परंपरा अधिक व्यापक केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हा उपक्रम पुढे आला. रायगडासह अकरा किल्ल्यांवर एकाच वेळी कार्यक्रम सुरू असल्याचे आमदार निलेश राणे यांनी नमूद केले.
गड-किल्ले संवर्धनाची ग्वाही
आमदार निलेश राणे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अधिवेशनानंतर पुरातत्त्व विभागासोबत बैठक घेऊन आवश्यक निधी आणि परवानग्यांबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. देशाला एकत्र ठेवण्याचे काम संविधान करत आहे. शेवटच्या घटकेपर्यंत न्याय संविधान देते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार गणेश लव्हे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता दूत संग्राम कासले आणि निलेश पवार यांनी केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा