पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाकडून राज्यभरात ‘सेवादूत’ हे विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. १ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत हे अभियान चालवले जाणार असून, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जिल्ह्यापासून तालुक्यांपर्यंत, गावांपासून वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचून नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.
जनतेच्या समस्या जाणून घेण्यावर भर
या अभियानादरम्यान नेते सरकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न, तसेच पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणी समजून घेण्यात येणार आहेत. जनतेच्या थेट संपर्कातून त्यांच्या गरजा आणि अपेक्षा जाणून घेणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रदेशाध्यक्षांची घोषणा
या अभियानाची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. २५ दिवस चालणाऱ्या या उपक्रमात पक्षाचे नेते राज्यभरात विविध ठिकाणी भेटी देणार असून, नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या २५ वर्षांच्या टप्प्याचे निमित्त साधून जनतेशी जोडले जाण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा