राजकोटमधील एका रुग्णालयात आहारतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षीय डॉली वडालिया यांचं लग्न खिलन वडालिया नावाच्या तरुणाशी झालं. खिलन हे कॅनडातील कॅलगरी शहरात काम करतात. लग्नसमारंभ आणि सोहळे संपल्यावर वडालिया कुटुंबानं डॉलीला तिच्या पतीसोबत कॅनडाला पाठवण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर असं काही घडलं की त्यांनाही मोठा धक्का बसला.
त्यांना कळलं की, डॉली ही जगातील कोणत्याही देशाची नागरिक नव्हती. त्यामुळे डॉलीचं पतीसोबत कॅनडाला जाण्याचं नियोजन धुळीला मिळालं.
डॉली यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांशी संपर्क साधला. सरकारी अधिकाऱ्यांसमोर त्यांनी जोरदार युक्तिवाद केला की, त्या जन्मानंतर २५ दिवसांची असल्यापासून राजकोटमध्ये राहिलेल्या आहेत, राजकोटमध्येच शिकलेल्या आहेत आणि राजकोटमध्येच त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्या भारताच्या नागरिक आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं.
पण अधिकाऱ्यांनी विविध कायद्यांचा हवाला देत त्यांचं म्हणणं स्वीकारलं नाही. त्यामुळे त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. पण त्यांना न्यायालयाकडूनही कोणताही दिलासा मिळाला नाही.
या सगळ्यात लग्नाला तीन वर्षे उलटून गेली. कुटुंबातही या कारणावरून तणावाचं वातावरण होतं. एकीकडे पत्नीला राजकोटमध्ये आणि पतीला कॅनडामध्ये, अशा जगाच्या दोन वेगवेगळ्या खंडांमध्ये राहावं लागत होतं. आता लग्नाला तीन वर्षे झाली असून ते दोघेही २६ वर्षांचे आहेत.
आता डॉली यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आला असून लवकरच कॅनडाचा व्हिसा मिळेल अशी त्यांना आशा आहे. त्यांचा इथवरचा प्रवास खडतर होता.
मोझांबिकमध्ये जन्म, राजकोटमध्ये आयुष्य
डॉली यांचा जन्म आफ्रिकेतील मोझांबिक देशात झाला होता. त्यांचे वडील केतन बराई हे १९९५ मध्ये आफ्रिकेच्या पूर्व भागातील मोझांबिक या देशात व्यवसाय करण्यासाठी गेले होते. त्यांचे काही कुटुंबीय आधीच तिथं स्थायिक झालं होतं. वडिलांनी मोझांबिकमधील झाई-झाई या किनारपट्टीच्या शहरात एक किराणा दुकान उघडलं.
नंतर त्यांची पत्नी आरती बराई यादेखील मोझांबिकला गेल्या. तिथे फेब्रुवारी २००० मध्ये या दांपत्याला एक मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी डॉली ठेवलं. आई-वडिलांनी मोझांबिक सरकारकडून डॉलीचा जन्म दाखलाही मिळवला.
पण डॉली यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी मोझांबिकमध्ये चक्रीवादळ आलं. त्यामुळे झाई-झाईमध्ये मुसळधार पाऊस पडला आणि भयंकर पूर आला. आई-वडिलांनी उभारलेलं सर्व काही या चक्रीवादळानं उद्ध्वस्त केलं. त्यानंतर डॉली २५ दिवसांची असताना तिचे आई-वडील तिला घेऊन भारतात आले. तेव्हापासून ती भारतातच होती.
तीन वर्षांचा संघर्ष, आता आशा
डॉली यांच्या म्हणण्यानुसार, जन्मानंतर अवघ्या २५ दिवसांत त्या भारतात आल्या आणि तेव्हापासून राजकोटमध्येच वाढल्या. तिथंच त्यांचं शिक्षण झालं आणि तिथंच त्यांनी नोकरीही केली. तरीही कागदोपत्री त्या कोणत्याच देशाच्या नागरिक ठरत नव्हत्या, हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं.
लग्नानंतर पतीसोबत कॅनडाला जाण्याचा मार्ग बंद झाल्यावर त्यांनी सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवले. राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी आपली बाजू मांडली. पण कायद्यांच्या चौकटीत त्यांचं म्हणणं बसत नव्हतं. गुजरात उच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळाला नाही.
तीन वर्षांच्या या संघर्षानंतर आता डॉली यांना भारतीय पासपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे लवकरच कॅनडाचा व्हिसा मिळेल आणि त्या पतीसोबत राहू शकतील, अशी त्यांना आशा आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा