मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा धैर्याने सामना करताना आयपीएस अधिकारी अशोक कामटे शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानाची आठवण आजही अनेकांच्या मनात ताजी आहे. २८ नोव्हेंबर २००८ रोजी दुपारी त्यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव पुण्यातील रक्षकनगर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्यावेळी परिसरात शोकाकुल वातावरण होते.
कामटे यांचा जीवनप्रवास
अशोक कामटे यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाला. त्यांचे आजोबा नारायण कामटे हे राज्याचे पहिले पोलिस महानिरीक्षक होते. त्यांचे वडील लष्करात कर्नल पदावरून निवृत्त झाले होते. कामटे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून इतिहास आणि इंग्रजी विषयात पदवी घेतली. त्यानंतर दिल्लीच्या सेंट स्टीफन महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८९ मध्ये ते भारतीय पोलिस सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले. भंडारा येथे पोलिस उपाधीक्षक म्हणून त्यांनी उमेदवारी केली. त्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. २००६ ते २००८ या काळात ते सोलापूरचे पोलिस आयुक्त होते. त्यानंतर मुंबईत पोलिस सहआयुक्त म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना राष्ट्रपती पदक, संयुक्त राष्ट्रांचे पदक, विशेष सेवा पदक आणि विदेश सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले होते.
शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्यावर
हल्ल्याच्या रात्री कामटे आपल्या मुंबईतील निवासस्थानी होते. दूरचित्रवाणीवर हल्ल्याच्या बातम्या पाहत असताना आपणही या कारवाईचा भाग असायला हवे, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर काही मिनिटांतच त्यांना कारवाईत सामील होण्याचा आदेश आला आणि ते बाहेर पडले. दहशतवाद्यांशी लढताना कामा रुग्णालयाजवळ ते शहीद झाले. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले, तर ३०८ जण जखमी झाले होते. मुंबई पोलिस दलातील १४ अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले होते. कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी त्यांच्या जीवनावर टू द लास्ट बुलेट हे पुस्तक लिहिले आहे. कामटे यांचे पार्थिव पुण्यात आणल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत सरकारी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा