दुचाकीवरून लहान मुलांना घेऊन जाणे ही अनेक पालकांसाठी रोजची गरज असते. शाळा, बाजार किंवा नातेवाईकांकडे जाताना मुलांना बाईकवर बसवले जाते. मात्र या प्रवासात थोडीशी निष्काळजीपणा झाला तरी मुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलांना बाईकवर नेताना काही महत्त्वाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलाला बाईकवर कुठे बसवावे
लहान मुलांना बाईकच्या पुढे टाकीवर बसवणे टाळावे. मुलाला नेहमी मागील सीटवर योग्य पद्धतीने बसवावे. बाईकवर चालकासह फक्त एकच प्रवासी असावा, अशी काळजी घ्यावी. मुलाचे पाय बाईकच्या मागील चाकाजवळ किंवा चेनजवळ जाऊ देऊ नयेत, कारण पाय अडकण्याचा गंभीर धोका असतो. पाय ठेवण्यासाठी योग्य फुटरेस्ट असून चाकाभोवती सुरक्षित गार्ड असल्याची खात्री करावी.
मुलांचे कपडेही प्रवासात महत्त्वाचे ठरतात. लांब ओढणी, स्कार्फ किंवा सैल कपडे बाईकच्या चाकात किंवा चेनमध्ये अडकू शकतात. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी मुलाचे कपडे व्यवस्थित आहेत का, हे तपासून घ्यावे.
हेल्मेट, हार्नेस आणि वेगाचे नियम
नऊ महिने ते चार वर्षे वयोगटातील मुलांना बाईकवर नेताना नियमांनुसार सेफ्टी हार्नेस वापरणे आवश्यक आहे. हार्नेसमुळे मुलाचे शरीर चालकाला सुरक्षितपणे जोडले जाते आणि प्रवासात मूल खाली पडण्याचा धोका कमी होतो. त्याचबरोबर मुलासाठी वेगळे, त्याच्या डोक्याला योग्य आकाराचे हेल्मेट घालावे. हेल्मेट डोक्यावर सैल नसावे आणि त्याचा पट्टा व्यवस्थित लॉक केलेला असावा.
चार वर्षांपर्यंतच्या मुलांना बाईकवर नेताना वेग ४० किलोमीटर प्रतितासपेक्षा जास्त नसावा. शक्यतो कमी वेगात आणि शांत रस्त्यावर प्रवास करावा. लहान मुलांना प्रवासात झोप येऊ शकते आणि अशावेळी त्यांचे शरीर पुढे किंवा बाजूला झुकण्याचा धोका असतो. त्यामुळे झोप येत असलेल्या मुलाला बाईकवर नेऊ नये, मुलाला जागे ठेवावे आणि त्याची स्थिती सतत तपासत राहावी. हेल्मेट, सेफ्टी हार्नेस, योग्य बसण्याची पद्धत आणि कमी वेग या गोष्टींकडे दुर्लक्ष न केल्यास मुलांसोबतचा प्रत्येक प्रवास सुरक्षित होऊ शकतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा