वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल पडले आहे. इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने, म्हणजेच एफडीएने, तिच्या मेंदू-संगणक जोडणीच्या पहिल्या महत्त्वपूर्ण मानवी चाचणीला मंजुरी दिली आहे. कंपनीने या अभ्यासाला लिंक असे नाव दिले आहे. 25 नोव्हेंबर रोजी या निर्णयाची घोषणा करण्यात आली. ही चाचणी प्रायोगिक उपकरणांच्या तपासणीसाठीच्या विशेष परवानगीअंतर्गत केली जाणार आहे.
या चाचणीमुळे अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना नवी आशा मिळाली आहे. शरीराची हालचाल करण्याची क्षमता गमावलेल्या रुग्णांना केवळ विचारांच्या जोरावर संगणक आणि डिजिटल उपकरणे चालवता येणार आहेत. हे उपकरण अद्याप प्रायोगिक अवस्थेत असून, या चाचणीच्या यशानंतरच त्याच्या व्यावसायिक वापराच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.
चिप कशी काम करते?
या तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी एन1 इम्प्लांट नावाची नाण्याच्या आकाराची अत्यंत सूक्ष्म चिप आहे. शस्त्रक्रियेद्वारे ही चिप रुग्णाच्या कवटीमध्ये बसवली जाते. तिचे केसापेक्षाही बारीक असे अतिसूक्ष्म इलेक्ट्रोड धागे मेंदूच्या हालचाली नियंत्रित करणाऱ्या भागात जोडले जातात. जेव्हा रुग्ण एखादी हालचाल करण्याचा विचार करतो, तेव्हा मेंदूमध्ये निर्माण होणारे विद्युतीय संकेत हे धागे टिपतात आणि वायरलेस पद्धतीने ते संगणक किंवा स्मार्टफोनकडे पाठवले जातात.
यामुळे कोणताही शारीरिक स्पर्श न करता, केवळ विचारांच्या जोरावर रुग्ण संगणकाचा कर्सर हलवू शकतात, टायपिंग करू शकतात आणि डिजिटल उपकरणांचे नियंत्रण करू शकतात. जानेवारी 2024 मध्ये नोलंड अर्बॉग या पहिल्या रुग्णामध्ये ही चिप यशस्वीरित्या बसवण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी केवळ विचारांच्या साहाय्याने संगणकावर बुद्धिबळ खेळून आणि टायपिंग करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्याआधी कंपनीने प्राइम नावाचा सुरुवातीचा अभ्यासही केला होता.
कोणत्या रुग्णांवर चाचणी होणार?
या लिंक अभ्यासांतर्गत प्रामुख्याने एएलएस या गंभीर मज्जासंस्थेच्या आजारामुळे बोलण्याची आणि शरीराची हालचाल करण्याची क्षमता गमावलेल्या प्रौढ रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. एएलएस म्हणजे अॅमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस हा आजार. या चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर सुमारे 24 महिने नियमित तपासणी केली जाईल. यादरम्यान यंत्रणेची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासली जाईल.
शस्त्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्त्राव, संसर्ग, मेंदूला सूज येणे किंवा चिपचे धागे सरकणे यांसारख्या संभाव्य वैद्यकीय जोखमींवरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल. या चाचणीचे निकाल सकारात्मक आले, तर हालचाल गमावलेल्या हजारो रुग्णांसाठी डिजिटल जगाशी जोडले जाण्याचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा