प्रवासात हॉटेलमध्ये थांबताना आपण खोलीत शिरताच टीव्ही सुरू करतो, फोन चार्जिंगला लावतो आणि आरामात झोपतो. पण या नेहमीच्या सवयींमधून आपली खासगी माहिती धोक्यात येऊ शकते, असा इशारा एका निवृत्त कर्नलांनी दिला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी सामान्य लोकांवर कशी पाळत ठेवली जाऊ शकते आणि त्यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे, याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
## स्मार्ट टीव्ही झाकण्यामागचे कारण
निवृत्त कर्नल हनी बक्षी यांनी सांगितले की, हॉटेलच्या खोलीत शिरताच सर्वात मोठा टॉवेल शोधा आणि तेथील स्मार्ट टीव्ही टॉवेलने झाका. कारण कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून असू शकते. आजच्या स्मार्ट टीव्हीमध्ये कॅमेरा आणि माइक असू शकतो. त्यामुळे खोलीत कोणी नसताना किंवा तुम्ही झोपलेले असताना तुमची हालचाल किंवा आवाज कुणाच्या तरी नजरेत येऊ शकतो. टीव्ही झाकणे ही एक छोटी पण प्रभावी सावधगिरी ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
## फोन ड्रॉवरमध्ये ठेवण्याचा सल्ला
रात्री हॉटेलच्या खोलीत झोपताना आपला स्मार्टफोन ड्रॉवरमध्ये ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. फोनमध्ये असलेल्या छायाचित्रांचा एके दिवशी कोणीतरी गैरवापर करून तुम्हाला ब्लॅकमेल करू शकते, असा इशारा त्यांनी दिला. फोन नेहमी उघड्यावर ठेवण्याऐवजी झोपताना तो बंद करून ड्रॉवरमध्ये ठेवणे अधिक सुरक्षित ठरते. त्यामुळे फोनमधील माहिती कुणाच्या हाती लागण्याचा धोका कमी होतो.
वाय-फायबद्दलही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. घरी वाय-फाय सुरू करताना त्यात अनेकदा ‘इनसिक्युअर कनेक्शन’ किंवा ‘नो सिक्युरिटी’ अशी सूचना दिसते. याचा अर्थ ते कनेक्शन पूर्णपणे सुरक्षित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. फोनमध्ये घुसखोरी करणारे तुमच्या वाय-फायचाही वापर करू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा हॉटेलमध्ये वाय-फाय वापरताना अधिक सावध राहण्याची गरज आहे.
सायबर गुन्हेगारी वाढत असताना अशा छोट्या सवयी आपले रक्षण करू शकतात. टीव्ही झाकणे, फोन ड्रॉवरमध्ये ठेवणे आणि असुरक्षित वाय-फायबद्दल जागरूक राहणे या गोष्टी अंगीकारल्यास प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो, असा त्यांचा सल्ला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा