सर्वोच्च न्यायालयाने कंटेंट क्रिएटर्स, रील बनवणारे आणि मान्यता प्राप्त पत्रकार यांच्यातील सीमारेषा स्पष्ट केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाशी संबंधित प्रकरणावेळी न्यायालयाने याबद्दल भाष्य केले. स्वयंघोषित पत्रकारांना मान्यता प्राप्त पत्रकारांप्रमाणे संरक्षण मिळणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असताना पत्रकारांसोबत गैरवर्तन झाल्याचे प्रकार घडले. यासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मान्यता प्राप्त पत्रकारांप्रमाणेच स्वयंघोषित पत्रकारांना सुरक्षा मिळेल, हे गरजेचे नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी केली.
रील बनवणाऱ्यांसाठी झटका
सर्वोच्च न्यायालयाची ही टिप्पणी रील तयार करणाऱ्या आणि कंटेंट क्रिएटर्ससाठी झटका मानली जात आहे. सध्याच्या घडीला कंटेंट क्रिएटर्सची संख्या वाढली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर दिल्ली पोलिसांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. आंदोलनांचे वार्तांकन करणाऱ्या मान्यता प्राप्त पत्रकारांना संरक्षण दिले जाते. तसेच संरक्षण आम्हालाही मिळावे, असा दावा रील बनवणाऱ्या आणि कंटेंट क्रिएटर्सना करता येणार नाही, असे दिल्ली पोलिसांनी आधीच म्हटले आहे.
न्यायमूर्ती बागची यांनी काय म्हटले
दर्जा स्वतःहून दिला जाणारा नाही, असे न्यायमूर्ती बागची म्हणाले. तुम्ही वर्तमानपत्राचे पत्रकार आहात, तुम्ही मान्यता प्राप्त पत्रकार आहात. जर तुम्ही वृत्तपत्र किंवा टीव्ही चॅनलचे पत्रकार आहात, तर त्या हिशोबाने तुम्ही मान्यता प्राप्त आहात. तुम्ही एक ऑनलाईन पत्रकारही असू शकता किंवा नोंदणीकृत पत्रकारही असू शकता. पण आता आपण एक असा काळ पाहत आहोत, ज्यामध्ये लोक स्वतः पत्रकार असल्याचा दावा करतात. स्वयंघोषित पत्रकारांना मान्यता प्राप्त पत्रकारांसारखे संरक्षण मिळू शकत नाही, असे न्यायमूर्ती बागची म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा