दरवर्षी पेन्शनधारकांना आपण जिवंत असल्याचे प्रमाण पेन्शन वितरण करणाऱ्या संस्थेकडे जमा करावे लागते. हे प्रमाण वार्षिक स्वरूपात असते, त्यामुळे ते प्रत्येक वर्षी जमा करणे बंधनकारक आहे. 30 नोव्हेंबर 2026 ही तारीख जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची शेवटची मुदत आहे. 26 ऑक्टोबर 2026 रोजी भारताच्या पेन्शन व पेन्शनधारक कल्याण विभागाने देशातील केंद्र सरकारी पेन्शनधारकांसाठी याबाबत महत्त्वाची अधिसूचना जारी केली होती. आता पेन्शनधारकांकडे फक्त शेवटचे 4 दिवस शिल्लक आहेत. या मुदतीत प्रमाणपत्र जमा केले नाही तर डिसेंबर महिन्याची पेन्शन मिळणेही कठीण होऊ शकते. एखाद्या पेन्शनधारकाच्या कमाईचे एकमेव स्रोत मासिक पेन्शन असेल तर एका महिन्याची पेन्शन न आल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित बिघडू शकते. त्यामुळे हे प्रमाणपत्र पेन्शन वितरक संस्थेकडे वेळेवर जमा करणे फारच आवश्यक आहे.
प्रमाणपत्र तयार करण्याचे पर्याय
पेन्शनधारकांना बँकेत जाऊन, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून किंवा घरबसल्या ऑनलाईनही जीवन प्रमाणपत्र तयार करता येते आणि पेन्शन वितरक संस्थेकडे जमा करता येते. पेन्शन वितरण करणाऱ्या बँकेत जाऊन प्रमाणपत्र तयार करण्याची तसेच जमा करण्याची मुभा आहे. मात्र त्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागू शकते. या ठिकाणी डिजिटल प्रमाणपत्र तयार करण्यापासून ते मूळ कागदी प्रमाणपत्र जमा करण्याची मुभा आहे. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) घरपोच सेवेतूनही पेन्शनधारकांना सुविधा मिळते. पोस्टमन पेन्शनधारकाच्या घरी भेट देऊन जीवन प्रमाणपत्र तयार करून घेतो. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही, मात्र जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी 70 रुपये शुल्क भरावे लागते.
घरबसल्या डिजिटल प्रमाणपत्र कसे तयार करावे?
घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याची तसेच संबंधित संस्थेकडे जमा करण्याची मुभा आहे. या डिजिटल प्रमाणपत्राला मूळ कागदी पत्राइतकेच महत्त्व आहे. घरबसल्या जीवन प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पेन्शनधारकांनी जीवन प्रमाण किंवा आधार फेस आरडी या दोन ॲप्लिकेशनपैकी एकाचा वापर करावा. ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यात पेन्शनधारकाचा आधार कार्ड क्रमांक, पीपीओ क्रमांक, पेन्शन वितरक संस्था तसेच बँकेचा तपशील यांसारखी आवश्यक माहिती भरावी. या प्रक्रियेत पेन्शनधारकाच्या चेहऱ्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर पेन्शनधारकाचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार होते आणि SMS च्या माध्यमातून प्रमाण आयडी मिळतो. मात्र पेन्शन वितरक संस्थेकडे आपले जीवन प्रमाणपत्र जमा झाले आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक असते.
प्रतिक्रिया व्यक्त करा