कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मगरींची दहशत पसरली आहे. दिवसा शेतात आणि रात्री थेट रस्त्यावर मगरी फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खोची-दुधगाव रस्त्यावरील पुलाजवळ दररोज एका महाकाय मगरीचे दर्शन होत असल्याचे शेतकरी आणि प्रवाशांनी सांगितले आहे. ही मगर सुमारे १५ फूट लांबीची असल्याचे सांगितले जाते.
ऊसतोडणी हंगामात मजुरांची चिंता वाढली
सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ऊसतोडणी कामगारांची या परिसरात ये-जा सुरू असते. अंधारात अचानक मगरीशी सामना झाला तर काय होणार, हा प्रश्न कामगारांसह शेतकऱ्यांना सतावतो आहे. रस्त्यावर मगर आली की वाहनांची चाके थांबतात आणि मगर बाजूला जाईपर्यंत प्रवाशांना पुढे जाता येत नाही. मगरीच्या भीतीने महिला शेतमजूर आणि शेतकरी शेताकडे जाणेही टाळत आहेत. त्यामुळे शेतीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
वनविभागाकडे मागणी
एखादी जीवघेणी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या मगरीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. दुधगाव परिसरातील या गंभीर परिस्थितीकडे वनविभाग वेळीच लक्ष देऊन मगरीला सुरक्षित स्थळी कधी हलवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रस्त्यावर आणि शेतात मगरीचा वावर असल्याने ऊसतोडणी मजूर जीव मुठीत धरून काम करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा