अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या म्हसवडच्या श्री सिद्धनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक झाली. यंदाची सिद्धनाथ यात्रा सर्वोत्तम ठरवण्यासाठी प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधारी गटाने कंबर कसली आहे.
रथोत्सवाची तयारी
पुढील महिन्याच्या नऊ तारखेला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव शहरात संपन्न होणार आहे. यानिमित्त भरणाऱ्या यात्रेच्या आढावा बैठकीत गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी पाटील आणि पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी यात्रा विना अडथळा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहून सुरळीत पार पाडण्याचे आवाहन केले. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन तिन्ही मान्यवरांनी म्हसवडकरांना दिले आहे.
प्रशासनाला कडक सूचना
बैठकीत विज वितरण कंपनीवर गोरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या विभागाने कामाला सुरुवात केली आहे. रथमार्गावरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून विना अडथळा विद्युत प्रवाह सुरू राहील, यावर लाइनमन तात्यासाहेब तावरे यांनी काम सुरू केले आहे.
यात्रेपूर्वीच्या तयारीला शहरात जोर आला असून पालिका प्रशासनासह इतर प्रशासकीय विभागही कामाला लागले आहेत. लाखो भाविक येणाऱ्या या यात्रेसाठी सुरक्षा आणि सोयीसुविधांची व्यवस्था करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा