बीएमडब्ल्यू मोटरराडने आपली नवीन २०२६ एम १००० आरआर सुपरबाइक भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत ५९.९० लाख रुपये ठेवण्यात आली असून कंपनीच्या डीलर नेटवर्कमध्ये बुकिंग सुरू झाले आहे. ही मोटारसायकल भारतात पूर्णपणे आयात केलेल्या स्वरूपात विकली जाणार आहे. जागतिक स्तरावर एफआयएम सुपरबाइक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये या मॉडेलने आपली रेसिंग क्षमता दाखवली आहे.
९९९ सीसी इंजिन; ३०० किमी प्रतितासांपेक्षा जास्त वेग
या सुपरबाइकमध्ये ९९९ सीसी क्षमतेचे चार सिलिंडर असलेले ऑइल-वॉटर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १४,५०० आरपीएमवर २१४.६ बीएचपी पॉवर आणि ११,१०० आरपीएमवर ११३ एनएम टॉर्क निर्माण करते. मागच्या मॉडेलच्या तुलनेत पॉवरमध्ये सुमारे ६ बीएचपी वाढ झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार बाइकचा कमाल वेग ३०० किमी प्रतितासांपेक्षा जास्त आहे. बाइकचे वजन १९४ किलो असून इंधन टाकी १६.५ लिटरची आहे. १७ इंचांच्या चाकांसह पुढे १२०/७० आणि मागे २००/५५ टायर दिले आहेत.
नवीन डिझाइन आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक्स
नवीन एम १००० आरआरमध्ये डिझाइनपासून ते रायडिंग तंत्रज्ञानापर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. बाइकच्या पुढील भागात नव्या डिझाइनचे फेअरिंग आणि एम विंगलेट्स ३.० देण्यात आले आहेत. हे विंगलेट्स कार्बन फायबर रिइन्फोर्स्ड प्लास्टिकपासून तयार केले असून वेगात बाइकला स्थिरता मिळावी आणि एरोडायनॅमिक्स सुधारावे, हा यामागचा उद्देश आहे. फ्रेममध्येही बदल करण्यात आले असून डाव्या बाजूला नवीन इंजिन माउंट देण्यात आला आहे. स्टीअरिंग हेडच्या भागातील फ्लेक्स वैशिष्ट्यांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे.
रायडरच्या नियंत्रणासाठी दिलेली इलेक्ट्रॉनिक सिस्टीम हे या सुपरबाइकचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोलमध्ये आता स्लाइड कंट्रोल फंक्शन समाविष्ट करण्यात आले आहे. स्टीअरिंग अँगल सेन्सरच्या मदतीने ही प्रणाली बाइकच्या स्लिप आणि स्लाइडवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. बीएमडब्ल्यू रेस एबीएस प्रोमध्ये नवीन ब्रेक स्लाइड असिस्ट फंक्शन देण्यात आले असून ब्रेकिंगदरम्यान बाइक स्लाइड होत असताना रायडरला नियंत्रण राखण्यास याची मदत मिळते. रेसट्रॅकसाठी एबीएस प्रो मधील स्लिक सेटिंगही देण्यात आली आहे.
ही बाइक ब्लॅकस्टॉर्म मेटॅलिक आणि एम मोटरस्पोर्ट अशा ड्युअल-टोन रंगसंगतीत मिळेल. एम कॉम्पिटिशन पॅकेज मानक स्वरूपात देण्यात आले असून त्यात एम कार्बन व्हील्स, कार्बन पार्ट्स, हलकी एम फूटरेस्ट सिस्टीम, डीएलसी कोटेड एम एन्ड्युरन्स चेन आणि एम जीपीएस लॅपट्रिगर यांचा समावेश आहे. बाइकसोबत तीन वर्षांची अमर्यादित किलोमीटर वॉरंटी मिळते; ती चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी वाढवण्याचा पर्यायही आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा