शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचावा, यासाठी राबविण्यात येत असलेल्या ॲग्रीस्टॅक योजनेत महाराष्ट्राने मोठी प्रगती केली आहे. राज्यातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांकडे आता फार्मर आयडी आहे. या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
फार्मर आयडी म्हणजे काय
ॲग्रीस्टॅक हे कृषी क्षेत्रातील माहिती आणि डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आलेले डिजिटल व्यासपीठ आहे. या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र डिजिटल ओळख, म्हणजेच फार्मर आयडी दिला जात आहे. १८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. २१ जानेवारी २०२५ पासून नागरी सुविधा केंद्रांमार्फत फार्मर रजिस्ट्रीची नोंदणी केली जात आहे.
२०२१ च्या कृषी गणनेनुसार राज्यात १.७१ कोटी खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी १.४४ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे.
योजनांचे लाभ मिळणे होणार सोपे
या योजनेमुळे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी आणि शेतीच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ घेण्यासही मदत होणार आहे. पीक विमा, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नुकसानभरपाई, शेतकऱ्यांचे सर्वेक्षण आणि कृषी व संलग्न विभागांना लागणारी माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची ठरत आहे.
शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनीची आधारसंलग्न माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांची पडताळणी सोपी झाली आहे. लाभ वितरणात पारदर्शकता आली असून, कागदपत्रांची वारंवार पडताळणी करण्याची गरज कमी झाली आहे. शेतकऱ्यांना वारंवार शेतजमिनीची मालकी सिद्ध करावी लागत नाही. उर्वरित शेतकऱ्यांनीही आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा