कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आता रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. मनोज जरांगे घाबरले आहेत, म्हणूनच माझ्याकडे बोट दाखवत आहेत, अशा शब्दांत कदम यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
कदम यांचा पलटवार नेमका काय
तुमची पत्रकार परिषद होण्याआधीच बीडमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजली होती. ती माझ्याकडे दुसऱ्याच दिवशी आली, तेव्हा मी त्यावर बोललो, असंही कदम यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींचे कथित आरोप करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी आता चौकशी लावली आहे. त्यामुळे सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वासही यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे.
माझ्याकडे खूप काही मसाला आहे, मात्र सध्या मला काही बोलायचं नाही. चौकशीत जे काही आहे ते निष्पन्न होईल, असं सूचक विधान करत कदम यांनी या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढवला आहे. आता रामदास कदम यांच्या या पलटवारावर मनोज जरांगे पाटील काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी आणि एसआयटी चौकशी
मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून पाचशे कोटी रुपये घेतले आणि ते श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगे पाटलांकडे पाठवले, असा उल्लेख होता. या ऑडिओ क्लिपवरून राजकारण चांगलंच तापलं होतं आणि या क्लिपच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली होती.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात एसआयटीची स्थापना केली. दरम्यान एसआयटीचं पथक बुधवारी अंतरवाली सराटी इथे देखील आलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर रामदास कदम यांची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता जरांगे पाटील यांच्या मागणीवर कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा