रुग्णालयात पाणी नाही म्हणून डायलिसिस झाले नाही आणि रुग्णांना तसेच घरी पाठवण्यात आले. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील स्वातंत्र्यसैनिक हकीम अजमल खान रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयाच्या स्वतंत्र जलवाहिनीवर अनधिकृत पाणी कनेक्शन घेतल्याने रुग्णालयातील पाणीसाठा संपला आणि सात रुग्णांचे डायलिसिस होऊ शकले नाही.
पाणीसाठा का संपला
रुग्णालयाच्या स्वतंत्र जलवाहिनीवर अनधिकृत पाणी कनेक्शन घेतल्याने रुग्णालयातील पाणीसाठा संपला. त्यामुळे सात रुग्णांचे डायलिसिस होऊ शकले नाही. या रुग्णांना उपचार न करताच घरी पाठवण्यात आले. रुग्णालयाला टँकरनेसुद्धा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी पाणीसाठा संपला होता.
तिसऱ्या सत्रातील सात रुग्णांवर परिणाम
या रुग्णालयात रोज तीन सत्रांत डायलिसिस केले जाते आणि प्रत्येक सत्रात ९०० लिटर पाणी लागते. रुग्णालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिनीतून शुक्रवारपासून पाणी येत नव्हते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे टँकरची मागणी करण्यात आली. मात्र त्यांनीही टँकर देण्यास असमर्थता दर्शवली. परिणामी सोमवारी तिसऱ्या सत्रातील रुग्णांचे डायलिसिस पूर्ण करण्याएवढा पाण्याचा साठा रुग्णालयात उपलब्ध नव्हता. त्यामुळे तिसऱ्या सत्रातील सात रुग्णांचे डायलिसिस न करताच त्यांना घरी पाठवण्यात आले.
या वृत्तानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. महापौरांनी तातडीने या प्रकाराची दखल घेत रुग्णालयाच्या पाणीपुरवठ्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णांचे नियमित डायलिसिस असल्याने एक दिवस उशीर झाला तरी चालेल, पण रुग्णालयात पाण्याअभावी उपचार लांबणार असतील तर यंत्रणा नेमके काय करतेय, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा