महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिपाई पदासाठी मोठी भरती सुरू असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेत २० जागा आणि प्रत्येक पंचायत समितीत १० जागा असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच शिपाई पदासाठी २५ हजार रुपये पगार मिळेल, असेही या मेसेजमध्ये म्हटले आहे. मात्र हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. अशी कोणतीही राज्यव्यापी भरती जाहीर करण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या व्हायरल मेसेजचे फॅक्ट चेक केले असून हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.
व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा आहे?
व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती’ अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात कंत्राटी तत्त्वावर शिपाई पदासाठी तात्काळ भरती सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, १० वी व १२ वीची गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आणि चारित्र्य प्रमाणपत्र अशी कागदपत्रेही नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकजण या मेसेजवर विश्वास ठेवून भरतीची माहिती शोधत आहेत. मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा असून त्यात दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे, असे फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झाले आहे.
सरकारचे स्पष्टीकरण काय आहे?
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २० आणि प्रत्येक पंचायत समितीमध्ये १० पदे अशा स्वरूपाची कोणतीही राज्यव्यापी भरती ग्रामविकास विभाग, कोणत्याही जिल्हा परिषद अथवा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. सध्या शिपायांसह चतुर्थश्रेणी पदांची नियमित भरती सुरू आहे. रिक्त पदे कंत्राटी किंवा बाह्यस्रोत पद्धतीने भरण्याची प्रक्रिया प्रत्येक जिल्हा परिषद स्वतंत्रपणे राबवते. त्यामुळे व्हायरल मेसेजमधील दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा